'डोळ्यांत पाणी आलं...': 'सैयारा'च्या यशानंतर अमृतसरच्या शाळेने केलेल्या गौरवा मुळे अनीत पड्ढा भावूक
सैयारा या यशस्वी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनीत पड्ढा तिच्या शाळेच्या खास अभिनंदनामुळे भावूक झाली. अमृतसरमधील स्प्रिंग डेल सिनियर स्कूल ने अनीतच्या यशाचा उत्सव साजरा करत एक खास व्हिडिओ तयार केला, जो पाहून अनीतच्या डोळ्यांत पाणी आले. तिने तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या व्हिडिओत अनीतचा प्रवास – एका हुशार विद्यार्थिनीपासून 2025 मधील बॉलिवूड स्टार बनण्यापर्यंत – दाखवण्यात आला आहे.
अनीत पड्ढा ही फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आली आहे. तिचं बालपण अमृतसरमध्ये गेलं आणि तिने जाहिरातींद्वारे करिअरला सुरुवात केली. बिग गर्ल्स डोंट क्राई ही तिची पहिली सीरीज होती. मात्र, 'सैयारा' ह्या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचवलं.
या विशेष व्हिडिओत अनीतच्या जुन्या शिक्षकांनी तिच्या शाळेच्या आठवणी जागवल्या आणि तिला एक हुशार, अभ्यासू आणि क्रियाशील विद्यार्थीनी म्हणून ओळखलं. व्हिडिओत अनीतच्या शालेय नाट्यप्रयोगांचे फोटो, वर्गमित्रांसोबतचे काही कधीही न पाहिलेले क्षण दाखवण्यात आले आहेत.
स्प्रिंग डेल स्कूलने लिहिलं:“आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या माजी विद्यार्थिनी अनीत पड्ढाने यशराज फिल्म्सच्या 'सैयारा' या मोठ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. तिच्या या यशाबद्दल मनापासून अभिनंदन आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
अनीतने हे प्रेम पाहून एक भावनिक पोस्ट लिहिली: “हे पाहून मी अक्षरशः शांत बसले. चेहऱ्यावर मोठ्ठं हसू होतं आणि डोळ्यांत पाणी. डेल्स म्हणजे माझं दुसरं घर आहे, इथेच मी मोठी झाले, स्वप्न पाहायला शिकले आणि इथेच माझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला — जेव्हा मलाच स्वतःवर विश्वास नव्हता. हा सुंदर व्हिडिओ बघताना माझ्या शिक्षकांनी, मार्गदर्शकांनी आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी दिलेली साथ मनाला स्पर्शून गेली.
आता जेव्हा मी सेटवर उभी असते, तेव्हा अजूनही मला जाणवतं की मी तीच छोटी मुलगी आहे — जिचं स्वप्न होतं असं आयुष्य जगण्याचं.”
तिने पुढे लिहिलं: “मी आशा करते की तुम्ही माझ्यावर फक्त या चित्रपटासाठीच नव्हे, तर एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्यासाठीही अभिमान वाटेल. मी लवकरच परत येईन आणि तुमचं प्रत्येकाचं प्रत्यक्ष भेटून आभार मानीन. तुम्ही मला केवळ शिक्षण दिलं नाही, तर माझी ओळख घडवली — जे मी कधीच विसरणार नाही. तुमचं मनापासून आभार, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, पाठिंबा दिला आणि हेही आठवण करून दिलं की मी कितीही दूर गेले, तरी परत येण्यासाठी माझं एक घर नेहमीच असेल.”
📲 पोस्ट इथे बघा - https://www.instagram.com/reel/DMzTcASyjKV/?utm_source=ig_web_copy_link
‘सैयारा’ हा 2025 मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी निर्मित आणि मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात अनीत पड्ढा प्रमुख भूमिकेत असून वायआरएफ चा नवा हिरो म्हणून अहान पांडे ने पदार्पण केले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹278.75 कोटींची कमाई केली आहे.