‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित
मातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरण अशा एका पेक्षा एक वैशिष्ट्यांनी सजलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. ‘नाच मोरा...’ या श्रवणीय गीताने रसिकांच्या मनावर गारूड केल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेत्रसुखद दृश्यांना काव्यमय संवादांची सुरेल किनार जोडलेला हा टिझर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे.
श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हिंदीत काम केलेले आलोक जैन यांनी केले आहे. सुबोध भावेच्या व्यक्तिरेखेच्या मुखातून उमटणारा "जन्म आपल्या हातात नसतं, असतं ते फक्त जगणं..." हा जीवनाचा तत्त्वज्ञान सांगणारा संवाद टिझरची सुरुवात करतो. त्यानंतर टिझर जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मांडतो. याच दरम्यान मानसी नाईकची एन्ट्री होते आणि तिच्या संवादातून नायकाला सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा मिळते. उत्कंठावर्धक शेवटामुळे टिझर अधिक प्रभावी ठरतो. सुबोध भावे आणि मानसी नाईक यांची केमिस्ट्री, सुबोधचा नवा लुक आणि मानसीचे ग्लॅमर यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटाचे संगीत गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी दिले असून गीतकार अभिषेक खणकर यांची प्रभावी गीते हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली संगीतप्रेमींना सादर केली जात आहेत. ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी संवादलेखन केले आहे, तर छायांकन सुनील पटेल यांचे आहे. वितरणाची जबाबदारी सिनेपोलीसने सांभाळली आहे.
टिझरमुळे आधीच उत्सुकतेची लाट उसळली असून, प्रेक्षक आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ प्रेक्षकांना केवळ कथानक नाही तर भावनांचा प्रवास, जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी आणि पडद्यावर घडणारा काव्यमय अनुभव देईल, असा विश्वास अधिकच दृढ होत आहे.