गोव्याच्या ट्रिपमध्ये स्टार्सची रेलचेल!
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मल्टीस्टारर जलवा
मराठी चित्रपटांमध्ये दमदार कथा आणि तितक्याच प्रभावी कलाकारांचा संगम प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतो. आता असाच एक भन्नाट मल्टीस्टारर अनुभव घेऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट ३१ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स आणि मैत्रीचा रंगतदार प्रवास सांगणाऱ्या या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार एकाच पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.
चित्रपटात अंकुश चौधरी ‘मामा’च्या भन्नाट भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांची धमाल चौकडी प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधील या चौघांची भन्नाट केमिस्ट्री आणि भन्नाट टायमिंगने आधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या मुख्य कलाकारांसोबत नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. एवढ्यावरच न थांबता महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, प्रवीण तरडे, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे आणि अवधूत गुप्ते यांच्यासारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अर्थात त्यांच्या भूमिका काय आहेत, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांनीही या चित्रपटातून अभिनयाची जबाबदारी स्वीकारली आहे. पडद्यामागे कथा उभी करणारे विजू माने यांचा यावेळी पडद्यावरील अभिनयही प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर घडणारी ही धमाल कथा, भन्नाट कलाकारांची फौज आणि मनोरंजनाचा फुल ऑन डोस घेऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा मल्टीस्टारर चित्रपट ३१ जुलैपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
