माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 'वेव्ह्ज 2027'च्या 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' सीझन 2 अंतर्गत उद्योगक्षेत्राच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या विविध आव्हानांसाठी प्रस्ताव आमंत्रित
तरुणांमधील कल्पकता, कौशल्ये आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी 50 हून अधिक आव्हाने
निवडलेल्या आव्हानांना 1 कोटी रुपयांपर्यंतचे एकरकमी अनुदान मिळण्याची संधी
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' (WAVES-वेव्ह्ज) या ओटीटी मंचा अंतर्गत 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' (सीआयसी) हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाच्या दुसऱ्या हंगामासाठी (सीझन 2) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योग संघटना, संस्था आणि प्रतिष्ठानांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. उद्योग-नेतृत्वाखालील विविध आव्हानांची संकल्पना, रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या दुसऱ्या हंगामासाठी एक स्वतंत्र सामायिक पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच, पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित प्रक्रियेतून, आव्हाने आणि त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची निवड केली जाईल.
'सीआयसी'च्या दुसऱ्या हंगामाचा उद्देश उद्योगांच्या नेतृत्वाखाली, सरकारच्या सहकार्याने आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध आव्हाने राबवणे हा आहे. यामुळे सर्जनशील प्रतिभेचा शोध घेऊन ती जोपासणे, कौशल्य वृद्धी आणि क्षमता निर्माण करणे, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि माध्यम तसेच करमणूक क्षेत्रातील विविध घटकांमध्ये सहकार्याच्या संधी निर्माण करणे शक्य होईल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), एव्हीजीसी-एक्सआर, डिजिटल माध्यमे आणि इतर तंत्रज्ञान-आधारित सर्जनशील क्षेत्रांचा समावेश असून, यातील विजेत्यांचे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन, 'वेव्ह्ज 2027' मधील 'क्रिएटोस्फिअर' येथे भरवण्यात येईल.
माध्यम आणि करमणूक (एम & ई) क्षेत्रातील संस्थांना त्यांचे प्रस्ताव https://wavesbazaar.com/create-india-challenge/season2/ifp या ऑनलाइन पोर्टलवर, निश्चित केलेल्या मुदतीत, म्हणजेच 31.07.2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन केले आहे. हे आव्हानात्मक प्रस्ताव माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध विभागांशी संबंधित असावेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आणि समाज माध्यमे, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ऑनलाइन सोशल गेमिंग, ई-स्पोर्ट्स, कॉमिक्स, एक्सआर /एआर / व्हीआर, चित्रपट, प्रसारण, संगीत, नृत्य तसेच या क्षेत्रातील इतर उदयोन्मुख विषयांचा समावेश असावा.
अर्ज करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा

'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' च्या दुसऱ्या हंगामात उद्योगांच्या नेतृत्वाखालील 50 हून अधिक आव्हाने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता , डिजिटल आणि समाजमाध्यमे तसेच एव्हीजीसी-एक्सआर यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. निवडलेल्या आव्हानांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी, मंत्रालय प्रत्येक आव्हानासाठी 1 कोटी रुपयांपर्यंतचे एकरकमी अनुदान देऊ शकते. हे अनुदान प्रस्तावाचा नेमका दृष्टिकोन, परिणामांची दिशा, कौशल्य विकासाचे उपक्रम, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोच, तसेच विविध तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन निकष आणि आयएफपी दस्तऐवजात नमूद केलेल्या अटी- शर्तींच्या अधीन राहील.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) विषयी माहिती
'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' हा 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' (वेव्ह्ज) अंतर्गत एक प्रमुख उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील सर्जकांचा शोध घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांचे सादरीकरण करणे हा आहे. सीआयसी –हंगाम 1दरम्यान, उद्योगांच्या नेतृत्वाखालील 33 आव्हानांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, आता हंगाम-2 हा तरुण-केंद्रित आव्हाने, उद्योगांसोबतची भागीदारी, तळागाळातील पोहोच, सुनियोजित मार्गदर्शन आणि कौशल्य वाढवणे आणि परिणामकारक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. यामुळे भारताची सर्जनशील परिसंस्था अधिक मजबूत होईल आणि माननीय पंतप्रधानांच्या "क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड" (भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा) या द्रष्ट्या संकल्पनेला गती मिळेल.