Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजी ससाणे –शीतल पाटीलच्या निवडीची रुबाबदार कहाणी

 ऑडिशनमध्ये नाकारले, तरीही ‘रुबाब’मध्ये चमकले!

संभाजी ससाणे –शीतल पाटीलच्या निवडीची रुबाबदार कहाणी



झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ हा संवाद बोलणारा संभाजी ससाणे आणि जिच्यासाठी हा संवाद आहे, ती शीतल पाटील, ही फ्रेश आणि डॅशिंग जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. मात्र या जोडीचा ‘रुबाब’पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, हे फारच थोड्या जणांना माहित आहे.


विशेष म्हणजे, या दोन्ही कलाकारांना सुरुवातीला ऑडिशनमध्ये नकार देण्यात आला होता. तरीही पुढे तेच ‘रुबाब’चे हिरो–हिरोईन कसे बनले, याचा हा रंजक प्रवास त्यांनी शेअर केला आहे.


आपल्या निवडीबद्दल बोलताना संभाजी ससाणे सांगतो,  ''मला संजय झणकर सरांचा फोन आला, त्यानंतर काही दिवसांनी मी, संजयजी आणि शेखर रणखांबे भेटलो. मला वाटलं ऑडिशन होईल, पुढची चर्चा होईल… पण तेव्हा मला स्पष्ट सांगण्यात आलं की, ‘आम्ही जसा मुलगा शोधतोय, तू तसा नाहीस.’ तो दिवस मला आजही आठवतो. थोडंसं वाईट वाटलं होतं. पण दोन-तीन आठवड्यांनंतर पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आलं की, मी चित्रपटाचा भाग आहे. त्या क्षणी खूप आनंद झाला. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. माझी निवड कशी झाली, हे आजही मला पूर्णपणे कळलेलं नाही.''



तर शीतल पाटीलचा अनुभवही काहीसा असाच आहे. ती म्हणते, ''ऑडिशनसाठी बोलावलं तेव्हा मला वाटलं एखादी छोटी व्यक्तिरेखा असेल. ऑडिशननंतर शेखर सर आणि संजय सरांच्या प्रतिक्रिया पाहून मला जाणवलं की, इथे काहीच होत नाहीये. पण काही दिवसांनी अचानक फोन आला आणि सांगण्यात आलं,  माझी लीड रोलसाठी निवड झाली आहे. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मोठ्या पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि माझं ते 'रुबाब'ने पूर्ण केलं.'' 


या निवडीमागचं कारण स्पष्ट करताना दिग्दर्शक शेखर रणखांबे आणि निर्माते संजय झणकर म्हणतात, ''शीतलचं ऑडिशन आम्हाला त्या वेळी आवडलं नव्हतं आणि ते तिला जाणवलंही होतं. मात्र ज्या प्रकारचा चेहरा, डोळे आणि व्यक्तिमत्त्व आम्हाला त्या भूमिकेसाठी हवं होतं, ते सगळं तिच्याकडे होतं. वर्कशॉपदरम्यान तिने त्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आत्मसात केल्या. संभाजी आणि शीतल दोघांनाही सुरुवातीला नकार मिळाला होता, परंतु पुढे तेच आमचे हिरो आणि हिरोईन बनले. आणि त्यांनी आपल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत.”



झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ हा चित्रपट तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.