Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!*

*मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!*


*सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) :* राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते, अभिजित घोलप, यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या 'नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन' अर्थात ‘नाफा’ (NAFA) या संस्थेने नववर्षात अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणताही आर्थिक लाभ न घेता, स्वयंसेवकांच्या निष्ठा, समर्पण आणि कलाप्रेमावर उभी राहिलेली ही नो-प्रॉफिट संस्था आता आपल्या खास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून नॉर्थ अमेरिकेतील मराठी रसिकांच्या भेटीला आली आहे.




नुकताच लाँच झालेला ‘नाफा स्ट्रीम’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म उत्तर अमेरिका व कॅनडामधील प्रेक्षकांसाठी वेब, रोकु, आयओएस आणि अँड्रॉइड या सर्व माध्यमांवर उपलब्ध झाला आहे. मराठी चित्रपट, लघुपट, डॉक्युमेंट्री, वेबसीरिज आणि मास्टरक्लासेसचा दर्जेदार खजिना एकाच छताखाली आणण्याचे ध्येय या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य ठरते. उत्तर अमेरिका व कॅनडामधील मराठी प्रेक्षकांसाठी 'नाफा स्ट्रीम' हे मराठी मनोरंजनाचे हक्काचे OTT platform ठरणार आहे !


‘नाफा स्ट्रीम’वर NAFA मास्टरक्लास, कल्ट क्लासिक, तसेच नव्या दमदार चित्रपटांचा समावेश असणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना एक्स्क्लुझिव्ह ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ पाहण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’, ‘कासव’, ‘दिठी’, तसेच ‘धूसर’, ‘अनाहत’, ‘परतु’, ‘एक निर्णय’,'छबीला',यांसारखे दर्जेदार चित्रपट, वादग्रस्त ठरलेला ‘मनाचे श्लोक (तू बोल ना)’ आणि नुकताच सुपरहिट ठरलेला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ यांचा वर्ल्ड प्रीमियर हे विशेष आकर्षण ठरणार आहे.






विशेष म्हणेज ‘नाफा स्ट्रीम’वर दर्जेदार मराठी माहितीपटांचा समावेश करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय ‘नाफा’ने घेतला आहे.‘त्यामध्ये राष्टीय पुरस्कार प्राप्त 'बोलपटाचा मूकनायक', ही प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले ह्यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी गावाने अवलंबलेली 'participatory democracy ' ह्या बद्दलचा 'दिशा स्वराज्याची', इत्यादींचा समावेश आहे. हायाशिवाय ‘नाफा क्रिएटर्स’ म्हणजेच अमेरिकेत स्थायिक मराठी कलावंतांनी साकारलेल्या ‘डिअर प्रा’, पायरव,, ‘निर्माल्य', ‘योगायोग’, या विविध फेस्टिवल्स मध्ये गौरवलेल्या शॉर्टफिल्म्स सुद्धा ओटीटीवर पहायला मिळणार आहे. ‘नाफा स्ट्रीम’च्या वार्षिक सदस्यत्वासाठी विविध पर्याय उपलब्ध असून, 'नाफा' संस्थेच्या सर्व सभासदांना २० टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे.


‘नाफा स्ट्रीम’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “मराठी सिनेमा हा केवळ मनोरंजन नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, विचारांचा आणि संवेदनशीलतेचा आवाज आहे. ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून हा आवाज जागतिक पातळीवर पोहोचावा, निर्मात्यांना सन्मानजनक व्यासपीठ मिळावे आणि प्रेक्षकांना दर्जेदार आशय एका क्लिकवर उपलब्ध व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे मत घोलप यांनी व्यक्त केले.


‘नाफा स्ट्रीम’ बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रोजेक्ट लीड अर्चना सराफ यांनी सांगितले, “ नॉर्थ अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी  सहज सोप्या पद्धतीने, एका अँपच्या माध्यमातून, जुन्या- नवीन, नॉस्टॅल्जिक-कॉन्टेम्पररी ,मनाला वाटेल तश्या  मराठी मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा म्हणून टेक्नॉलॉजी, कंटेंट आणि कलावंत यांचा सुंदर मेळ साधून ,आम्ही एक उत्तम प्लॅटफॉर्म उभा केल्याचा आम्हाला आनंद आहे,”.



‘नाफा स्ट्रीम’ दर्जेदार आशय, कलावंतांना मिळणारा सन्मान आणि प्रेक्षकांचा विश्वास या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला हा प्लॅटफॉर्म मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवी दिशा, नवे बळ आणि नवे आंतरराष्ट्रीय क्षितिज उघडणारा ठरणार असून, ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून मराठी सिनेमा आता खऱ्या अर्थाने जगाच्या पडद्यावर झळकणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.