Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादची स्पर्धक अस्मिता गादेकरच्या स्वप्नांना मिळणार भरारी*

 *मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादची स्पर्धक अस्मिता गादेकरच्या स्वप्नांना मिळणार भरारी*

*स्टार प्रवाह आणि टीम होणार शालेय आणि सांगितीक वाटचालीत साथीदार*




स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या टॅलेण्टने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. मी होणार सुपरस्टारचा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. या पर्वातली स्पर्धक अस्मिता गादेकरने नुकताच याचा प्रत्यय घेतला. नाशिकच्या अस्मिताने काही दिवसांपूर्वीच वडिलांचं छत्र गमावलं. अस्मिता आणि तिच्या दोन बहिणींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची आई दिवसरात्र कष्ट करते. आपल्या मुलीने नाव कमवावं हे स्वप्न उराशी बाळगून अस्मिताच्या आईने तिला मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर आपलं टॅलेण्ट दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. याआधीच्या पर्वातही अस्मिताने सहभागी होण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र चौथ्या पर्वात तिला खऱ्या अर्थाने तिला सूर गवसला आणि तिची निवड झाली. अस्मिताने अल्पावधीतच आपल्या गाण्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच आदर्श शिंदेने गायलेलं एक भीमगीत अस्मिताने सादर केलं. तिने सादर केलेल्या परफॉर्मन्सला तिन्ही परिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. अस्मिताची गाण्यातली चमक पाहून स्टार प्रवाह वाहिनी आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या टीमने तिचा शालेय खर्च आणि सांगितीक वाटचालीसाठी लागणारी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे


सुप्रसिद्ध गायक आणि छोटे उस्तादचा जज आदर्श शिंदे याप्रसंगी म्हणाला, ‘अस्मिताने गायलेलं गाणं मी तिच्या वयाचा असताना रेकॉर्ड केलं होतं. पण ती माझ्यापेक्षा सुंदर गायली. मला अस्मिताचा अभिमान आणि गर्व आहे की इतक्या समजूतदारपणे तिने हे गाणं गायलं. माझ्या यापुढच्या कार्यक्रमांमध्ये अस्मिताने गाणं सादर करावं अशी माझी इच्छा आहे. छोटी उस्तादची मुलं मला प्रेमाने आदर्श दादा म्हणतात. दादा या नात्यानेच मी सांगू इच्छितो की अस्मिताच्या नववीतल्या अभ्यासाचा खर्च स्टार प्रवाह वाहिनी आणि छोटे उस्तादची टीम करणार आहे. इतकंच नाही तर अस्मिताला तिच्या सांगितीक वाटचालीत कुठलंही वाद्य लागलं तर तिने ते हक्काने माझ्याकडे मागावं.’




मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ही नुसती स्पर्धा नसून एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा सदस्य असल्याचा अभिमान प्रत्येकाला आहे. तेव्हा सुरांची ही मैफल नक्की अनुभवा दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.