Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट*

 *‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट*

*आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा सांगणारे धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित*



एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असून नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. या धमाल सोहळ्यात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ व  ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केले.



ट्रेलरमध्ये लालितच्या आयुष्यात आलेली वळणं ठळकपणे दिसत आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव, त्यातील बदलती नाती, डिजिटल युगातील संवादाचे रूप आणि व्हीएफएक्स यांचा सुंदर मिलाफ यात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भावनांनी भरलेली कथा आणि सतीश राजवाडेंची खास प्रेमकथेची मांडणी या सगळ्यांचा अनोखा संगम ‘प्रेमाची गोष्ट २’च्या ट्रेलरमधून दिसत आहे. 



दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘’ही एक फ्रेश आणि आजच्या काळाशी सुसंगत अशी प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचं तंत्रज्ञान केवळ दृश्यात्मक सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर कथा सांगण्याचा एक नवा मार्ग म्हणून वापरलं आहे. ही कथा जेन झी प्रेक्षक आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणारी आहे. म्हणजेच संपूर्ण कुटुंबासाठी योग्य असा हा चित्रपट आहे.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, ‘’सतीशसोबत माझा हा चौथा चित्रपट आहे. एकत्र आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्तम चित्रपट घेऊन आलो आहोत. आता प्रेक्षकांसाठी ‘प्रेमाची गोष्ट २’ घेऊन येत आहोत आणि प्रेक्षकांना ही प्रेमाची गोष्ट नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आम्ही नेहमी प्रेक्षकांसाठी मनाला भिडणाऱ्या आणि वेगळेपणा जपणाऱ्या कथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही त्याच परंपरेतली आणखी एक खास प्रेमकथा आहे, जी आजच्या पिढीच्या भावनांना आणि विचारांना अचूक स्पर्श करणारी आहे. सतीश राजवाडे यांनी ही कथा ज्या संवेदनशीलतेने उभी केली आहे, ती प्रेक्षकांना नक्की भावेल.”



एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास’ प्रेक्षकांना २१ ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवायला मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.