*"मुंबई लोकल" चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच*
*:मुंबई लोकल"मध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची रंगतदार गोष्ट*
*"मुंबई लोकल" १ ऑगस्टपासून चित्रपटगृहात*
आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.
"मुंबई लोकल" या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. असोसिएट डिरेक्टर म्हणून निकुंज मालपाणी यांनी काम पाहिले आहे तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे.
मुंबई लोकलमध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची गोष्ट "मुंबई लोकल" या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्या दोघांचा स्वतःचा असा स्ट्रगल आहे. मात्र, लोकलमध्ये एकमेकांना पाहताना ते एकत्र कसे येतात, त्यांच्यात प्रेम कसं फुलतं याची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेमाच्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा टीजरही हळुवारपणे उलगडत जातो. त्यामुळेच या चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये फुलणारी ही प्रेमाची गोष्ट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता १ ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
*Teaser Link*
https://youtu.be/zjzbvV7PJfg?si=QsiiNd1S1eE2Cthq