*स्वामींच्या बोरीवृक्षातून दिला जाणारा साक्षात्कार, घरातल्या वादांचा एक निरागस साक्षीदार!*
जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई, ७ जुलै २०२५:* कलर्स मराठीवरील “जय जय स्वामी समर्थ – उपदेश स्वामींचा कौल तुमच्या मनाचा” या शृंखले अंतर्गत सध्या सुरू असलेला नवा अध्याय विशेष चर्चेत आहे. कारण या अध्यायात प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे अलीकडे सर्वच घरात थोड्याफार फरकाने अनुभवायला मिळणारी अंतर्गत धुसफूस, त्याचा एका लहान मुलीवर होणारा खोल मानसिक परिणाम आणि स्वामी समर्थांचा सूक्ष्म, पण प्रभावी हस्तक्षेप. घरातल्या वादांचा एक निरागस साक्षीदार बनते शरयू आणि स्वामींच्या बोरीवृक्षातून होणाऱ्या साक्षात्कारातून तिचा उद्धार कसा होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
सासू-सुनांमध्ये असणाऱ्या अहंकार, अपेक्षा आणि सत्तास्पर्धेची ही कथा आहे. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे १० वर्षांची शरयू. एक हसरी, चैतन्यशील मुलगी… पण घरात सततचा कलह पाहून आतून गळून गेलेली, मनातली शांतता गमावलेली. आई आणि आजी दोघीही स्वामी भक्त; दोघींचं श्रद्धास्थान एकच श्री स्वामी समर्थ. पण वास्तवात मात्र त्या एकमेकींशी उरफोड करणाऱ्या. त्यांचं सततचं भांडण, टोचणं, दोषारोप, आणि एकमेकांना खाली खेचणं – या सगळ्याचं बळी ठरत आहे शरयूचं बालपण.
कधीकाळी फुलपाखरांसारखी उडणारी ही मुलगी आता स्वतःच्या खोल मनातल्या खोल कप्प्यात लपून बसलेली आहे. तिच्या नजरेतून दिसणाऱ्या या घरातल्या अस्थिरतेचा प्रेक्षकांना अंगावर काटा आणणारा अनुभव मिळणार आहे.
या सगळ्या गोंधळात, शरयू आपली भीती आणि दु:ख घेऊन धावत स्वामींच्या चरणांशी पोहोचते. तिचं रडणं, तिची थरथर, आणि तिचं एकच निरागस वाक्य – “आई आणि आजी सारख्या भांडतात… मला फार भीती वाटते…” – हे क्षण प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे आहेत. मानसिकदृष्ट्या जखमी होतंय एक बालमन त्याला कसा मार्ग दाखवणार स्वामी. या कथेचा गाभा आहे.
बालपणावर होणारा घरगुती कलहाचा परिणाम. जे वय हसण्याचं, खेळण्याचं असतं, त्या वयात जर सतत भीती, चिंता, आणि गोंधळ याने मन व्यापून टाकला, तर ते मूल हळूहळू आतून कोसळतं. शरयूचं पात्र हे केवळ अभिनय नाही. तर समाजातल्या हजारो मुलांचं प्रतिबिंब आहे, जे अशाच अस्थिर वातावरणात श्वास घेत असतात.
शरयू ही केवळ या कथेतली मुलगी नाही, ती आहे आपल्याच अवतीभवतीची एक प्रतिमा – जिच्या रक्षणासाठी, समजून घेण्यासाठी आणि सावरण्यासाठी स्वामी समर्थांसारखा मार्गदर्शक आवश्यक आहे.
स्वामींचं म्हणणं आहे साक्षात्कार नुसता चमत्कार नसतो… तो परिवर्तनाचा प्रारंभ असतो. स्वामी समर्थ या कथेत चमत्कार करत नाहीत ते अंतर्मुख करतात. ते देतात एक “उपदेश” – जो प्रत्यक्ष कृतीतून, प्रतीकातून, आणि योग्य वेळी दिलेल्या मौनातून दिला जातो. बोरीचं झाड, सरळ काठी, आणि विठ्ठल मूर्ती ही या कथानकातील प्रतीक आहेत जी स्वामींच्या मार्गदर्शनाचं मूर्त स्वरूप आहेत.
कथा जरी सासू-सूनांच्या संघर्षावर आधारित असली, तरी त्यातला खरी वेदना एका कोमेजलेल्या बालमनाची आहे. आणि त्याची फुलवणं हीच खरी भक्ती आहे. असं स्वामी अधोरेखित करत आहेत. आता ही सगळं कसं घडणार ? स्वामी समर्थ कसा मार्ग दाखवणार ? जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.