Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*गुरुपौर्णिमा विशेष: अद्वितीय स्वामी लीला उलगडणार 'नामस्मरणाचे' महात्म्य.*

 *गुरुपौर्णिमा विशेष: अद्वितीय स्वामी लीला उलगडणार 'नामस्मरणाचे' महात्म्य.* 


पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



 *मुंबई ९ जुलै, २०२५ :* कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत या आठवड्यात बघायला मिळणार आहे गुरुपौर्णिमा विशेष भाग. अध्यात्म, परंपरा आणि भक्तीने न्हालेलं अक्कलकोट हे गाव यंदा गुरुपौर्णिमेच्या  दिवशी एका विलक्षण साक्षात्काराचं साक्ष बनणार आहे. एकीकडे पारंपरिक कर्मकांडांवर विश्वास ठेवणारा प्रतिष्ठित ब्राह्मण आणि दुसरीकडे श्रम करताना अखंड नाम घेणारा एक साधा शेतकरी यांच्यातील अदृश्य वैचारिक संघर्ष अक्कलकोटच्या अध्यात्मिक वातावरणात गूढतेचं सावट निर्माण करतात. गावभर गुरुपौर्णिमेची जय्यत तयारी सुरू असताना, अक्कलकोट स्वामींच्या एका अनपेक्षित निर्णयामुळे सर्व भक्तगण आणि सेवेकरी चक्रावून गेले आहेत. स्वामींनी उत्सवाचं केंद्रस्थान अचानक बदलल्याने, एकच चर्चा सुरू आहे “गुरुपौर्णिमेच्या या भक्तीमय सोहळ्यात प्रत्यक्ष गुरू स्वतः कोणाच्या हातात हात घालून अवतरतील?” यंदाची गुरुपौर्णिमा केवळ धार्मिक विधी न राहता, ती एक अंतर्मनाचा शोध घेणारी अंतर्बिंबनाची प्रक्रिया ठरणार आहे. स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये उलगडत आहे – एका साध्याशा शेतकऱ्याच्या नितळ श्रद्धेतून साकारलेलं दिव्य सत्य – जिथे पूजा नाही, समारंभ नाही, पण "नाम" आहे… आणि नामातूनच गुरूचे साक्षात दर्शन आहे. स्वामी समर्थ कसे पटवून देणार नामस्मरणाचे महत्व, मालिकेत कसा साजरा होणार हा गुरुपौर्णिमेचा  दिवस. पहा जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष या आठवड्यात रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



स्वतःला ज्ञानी, कर्मनिष्ठ मानणाऱ्या मधुकरचा आत्मविश्वास ठाम आहे की हाच क्षण त्याच्यासाठीच आहे. यज्ञ, होम, विधी आणि कर्मकांड यांतूनच तो ईश्वरप्राप्तीचा मार्ग शोधतो. त्याच्या श्रद्धेला गरिमा आहे पण अहंकाराचं सावटही आहे. तर दुसरीकडे आहे सुदाम शेतात राबणारा, देवळात कधीही न गेलेला, पण गुरूचं नाम मनापासून घेत राहणारा एक शेतकरी. त्याची श्रद्धा गूढ आहे कारण ती प्रदर्शनातून नव्हे तर कर्मातून व्यक्त होते. तो मान मिळवण्याच्या स्पर्धेत नाही, पण त्याच्या जीवनशैलीत गुरूकृपेची निशाणी स्पष्ट जाणवते. ही गोष्ट आहे – श्रद्धा आणि अहंकार, कर्मकांड आणि साधेपणा, यज्ञ आणि नाम यांच्यातल्या संघर्षाची. आणि या संघर्षातूनच उलगडतेय एक अलौकिक लीला  जिथे "नाम" हे केवळ शब्द नाही, तर अंतरात्म्याला स्पर्श करणारा दिव्य अनुभव आहे. स्वामींच्या लीलेतून आणि त्यांच्या मौन शिकवणीतून हे अधोरेखित होतंय की, ईश्वरप्राप्तीसाठी ना पोथी लागते, ना समारंभ… लागते ती मनापासूनची भक्ती. आणि याच निष्ठेच्या प्रकाशात साकार होते एक विलक्षण सत्य: नामस्मरण हे आधुनिक काळातलं मेडिटेशन आहे, जे आत्म्याला जागं करतं, मन शांत करतं, आणि श्रद्धेला सामर्थ्य देतं. याची प्रचिती यंदाच्या जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना येणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.