अभिनेता आमिर खान याने ‘सितारे जमीन पर’च्या खास स्क्रीनिंगदरम्यान कान्हा शांती वनम् – हार्टफुलनेस मुख्यालय येथे दाजी यांच्याशी संवाद साधला.
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान शुक्रवारी हैदराबादच्या उपनगरात असलेल्या हार्टफुलनेस संस्थेच्या मुख्यालयात – कान्हा शांती वनम् येथे ‘सितारे जमीन पर’ या आपल्या नव्या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगसाठी उपस्थित होते. या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की, निर्णय घेणे, आकलन व अंतर्ज्ञान यामध्ये मनापेक्षा हृदयाचे स्थान अधिक महत्त्वाचे असते. ही संकल्पना हार्टफुलनेसच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे, जे हृदयाला जाणीव आणि चेतनेचे सर्वोच्च स्थान मानते. या निमित्ताने आमिर खान यांनी कान्हा शांती वनम् येथे भेट देऊन हार्टफुलनेसचे मार्गदर्शक व श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष पू. दाजी यांची भेट घेतली. त्यांनी मानव चेतनेतील अमर्याद शक्यतांबाबत मार्गदर्शन मागितले व विशेष आभार मानले. यावेळी त्यांनी ‘ब्रायटर माइंड्स’ या उपक्रमाबाबत माहिती घेतली, जो लहान मुलांना तीव्र बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी सक्षम करतो. या उपक्रमाची मांडणी चित्रपटातील ADHD, ऑटिझम किंवा इतर स्थितींमधील मुले – जी हृदयकेंद्रित विचारांमुळे विशेष क्षमतांनी युक्त असतात – यांच्याशी साधर्म्य साधते.
आमिर खान म्हणाले, “हार्टफुलनेसचा दृष्टिकोन खूपच सुंदर आहे. आपण या जगात माणूस म्हणून कुठे आहोत, आपल्यातील अंतर्निहित क्षमता काय आहेत, आणि मानवतेसाठी आपण काय करू शकतो – याविषयी सखोल समज मिळवण्याचा हा मार्ग आहे. ही विशेष मुले इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांच्या अंतर्गत सामर्थ्याची ओळख करून घेत जगात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मानवजातीला चेतनेच्या संतुलित आणि सर्वोत्तम मार्गावर नेण्यासाठी पू. दाजींच्या दृष्टिकोनाचे मला खूपच कौतुक वाटते.”