हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार प्रथमेश परब
आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. या कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव जोडले जाणार आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पोडर' या आगामी हिंदी चित्रपटात प्रथमेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
गुलमोहर टॅाकीजच्या बॅनरखाली निर्माते समीर शेख 'पोडर' चित्रपटाची निर्मिती करीत असून आदित्य केळगावकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रथमेशने आजवर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता तो प्रथमच हिंदीत नायक साकारणार आहे. गणेश पूजनानंतर प्रथमेशच्या हस्ते क्लॅप देऊन 'पोडर'चा मुहूर्त करण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमध्ये 'पोडर'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
प्रथमेशने आजवर नेहमीच विविधांगी व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे. विनोदी भूमिकांपासून गंभीर व्यक्तिरेखांनाही त्यांनी अचूक न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपला लाडका अभिनेता आता हिंदीत मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांना आहे. या चित्रपटात रजत कपूर, राजसी भावे, दुर्गेश कुमार आदी कलाकार झळकणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील विविध लोकेशन्सवर 'पोडर'चे चित्रीकरण केले जाणार आहे. डिओपी संदीप यादव या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करीत आहेत.