*'सन मराठी'वरील 'सोहळा सख्यांचा' कार्यक्रमात तब्बल १५०० महिलांचा विक्रमी सहभाग*
'सन मराठी'वरील ‘सोहळा सख्यांचा’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून त्याच्या प्रसिद्धीची प्रचिती 'सन मराठी' चॅनेलला नुकतीच आली. प्रेक्षक नेहमीच कार्यक्रमाबद्दलची पोचपावती सोशल मीडिया व पत्राद्वारे पोहोचवत असतात. नुकताच या कार्यक्रमाचा एक भव्य आणि रंगतदार भाग महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात शूट करण्यात आला. तब्बल १५०० महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांची पसंती दर्शवली आणि सन मराठी वहिनीला त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली. 'सोहळा सख्यांचा' हा कार्यक्रम आपल्या जवळच्या भागात व गावात शूट व्हावा यासाठी 'सन मराठी' वहिनीला चाहत्यांकडून भरभरून फोन येत आहेत. हा कार्यक्रम सध्या इतका प्रसिद्ध झाला आहे की, प्रत्येक महिला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. २६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या भागात १५०० महिलांचा जल्लोष पाहून एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. या भागात सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन खेळ खेळत धमाल मस्ती केली. १५०० महिलांमधून 'हुकुमाची राणी'चा बहुमान कोणाला मिळणार हे पाहणं रंजक ठरेल.
'सन मराठी' वाहिनी वरील सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय होण्यामागचं कारण म्हणजे, इथे प्रत्येक स्त्रीला ‘माहेरवाशीण’ म्हणून मान दिला जातो.हीच गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या मनाला भिडली आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर महिलांना आपण आपल्या माहेरी आलो आहोत असं जाणवतं. याचं श्रेय कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणजेच महिलांचा लाडका भाऊ आशिष पवार व त्यांच्या संपूर्ण टीमला जातं. २६ मे च्या भागात देखील आशिष पवार यांनी आपल्या खास विनोदी शैलीने सर्व स्त्रियांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं व त्यांना त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून दूर नेऊन काही क्षणांसाठी त्यांना भरगोस आनंद दिला.'सोहळा सख्यांचा' या कार्यक्रमाचा हा भव्य दिव्य भाग २६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता आपल्या 'सन मराठी'वर पाहायला मिळणार आहे.