Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"शूटिंगच्या आधी पांडुरंगाची माफी मागतो कारण..."

 "शूटिंगच्या आधी पांडुरंगाची माफी मागतो कारण..."

पांडुरंगाच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात म्हणून..."


मालिकाविश्वात पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित 'सखा माझा पांडुरंग' ही मालिका 'सन मराठी' वाहिनीवर दाखवली जाणार आहे. येत्या १० मार्चपासून 'सखा माझा पांडुरंग' ही मालिका सोमवार ते रविवार  सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत सखूबाईंची बालपणातील भूमिका बालकलाकार स्वराली खोमणे साकारणार आहे तर पांडुरंगाच्या भूमिकेत तेजस महाजन  पाहायला मिळणार आहे. याचसह नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांना आपलंस करून घेणारे अभिनेते सुनील तावडे नरोत्तम यांची भूमिका साकारणार आहेत.



या भूमिकेबद्दल बोलताना सुनील तावडे म्हणाले की, "'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत मी नरोत्तम ही खलनायकाची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत खलनायकाची किंवा पौराणिक भूमिका मी साकारली आहे पण नरोत्तम ही भूमिका साकारायला छान वाटत आहे. या भूमिकेची वेशभूषा, ऐट, आविर्भाव खूप वेगळा आहे. आतापर्यंत मी अशी भूमिका केली नव्हती म्हणून नरोत्तम यांची भूमिका मला आव्हानातम्क वाटते. अत्यंत क्रूर खलनायक साकारताना दुसऱ्यांचा कितपत छळ करता येईल हा एकच विचार या भूमिकेचा आहे. संत सखूबाई यांना  तो प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून मला अभिनयाची एक वेगळी छटा दाखवता येत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी गावाकडचा सेट दाखवला आहे म्हणून शूटिंग करताना सुद्धा प्रसन्न वाटत."


यापुढे सुनील तावडे यांनी सांगितलं की, "पौराणिक किंवा चरित्रकथा असेल तेव्हा जे डायलॉग असतील तेच आणि तसेच शब्द उच्चारणा होणं खूप गरजेचं आहे. अशा भूमिकांमध्ये तुमच्या अभिनयाचा कस लागतो. माझ्या आयुष्यात पांडुरंगाचं  महत्त्व खूप आहे. मला कीर्तनात रमायला खूप आवडत. मी आणि माझा भाऊ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कीर्तनात सामील होतो. विठ्ठल भक्त असल्यामुळे शूटिंगच्या आधी मी पांडुरंगाची  माफी मागतो की, तुझ्या विरुद्ध मला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत तर त्यासाठी तू मला माफ कर पांडुरंगाला असं सांगूनच मी कॅमेरासमोर जातो. आजपर्यंत प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला दाद दिली ही भूमिकाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ही खात्री आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.