*भक्तीचा परमोच्च आविष्कार घडणार स्वामी ‘मल्हारी मार्तंड’रूपात दर्शन देणार!*
जय जय स्वामी समर्थ मालिकेचा महारविवार विशेष भाग २३ फेब्रुवारी दु. १ आणि रात्री ८ वा.आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई 21 फेब्रुवारी,2025 :* स्वामी जगाची माऊली,स्वामी कृपेची सावली,ऐसी निरंतर माया,आम्ही कुठे ना पाहिली.गेली पाच वर्ष दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठीवरुन स्वामी कृपेचा हा गजर घराघरात सुरू असतो.अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या, मनाला उभारी देणाऱ्या , जगण्याची वाट सुकर करणाऱ्या या प्रवासाचा या आठवड्यात १४०० भागांचा टप्पा पूर्ण झाला.स्वामींच्या अलौकिक लीलांचे महापर्व मालिकेत सध्या सुरू असून गोपाळ बुवा केळकर लिखित स्वामी बखरीचा महाअध्याय मालिकेत अत्यंत नाट्यमय प्रसंगांनी उलगडत आहे.यातून मिळणारी जगणे समृद्ध करणारी शिकवण आणि स्वामीप्रेरणा अनेकांचे आयुष्य घडवणारी ठरली आहे. हाच स्वामी विचारांचा निरंतर प्रवास पुढे अखंड सुरू राहणार असून प्रेक्षकांच्या मनातले मालिकेचे हे अढळ स्थान असेच कायम राहील.हाच निर्धार पुढे नेणारा जय जय स्वामी समर्थ मालिकेचा २३ फेब्रुवारीला होणारा महारविवार विशेष भाग चुकवू नये असा आहे. *ज्यात स्वामी समर्थ भक्तांना मल्हारी मार्तंड रूपात दर्शन देणार आहेत* .तेंव्हा नक्की पहा जय जय स्वामी समर्थ मालिकेचा महारविवार विशेष भाग २३ फेब्रुवारी दु. १ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
तान्ही असताना खंडोबा मंदिरात पायरीपाशी सोडलेल्या अनाथ गौरीच्या,तारकमंत्राने झालेल्या उद्धाराची ही अत्यंत भावनिक गोष्ट आहे,त्याला मायेचा पदर आहे.स्वामी कृपेची सावली आहे.स्वामींनी छोट्या गौरीला बळवंतरावांचा मुलगा मार्तंड समोर कीर्तनस्पर्धेला उभे केले आहे.या स्पर्धेत तिला खंडोबा देवाचे पारंपरिक पद गायला सांगितले जाते आणि गौरी भावनिक होते.ज्या देवाच्या पायरीशी तिचा सांभाळ करणाऱ्या आबांनी जीव सोडला,त्या देवाची स्तुती कशी गाऊ असा प्रश्न तिला पडतो.ती स्वामींपाशी जाते आणि ते तिला आमच्या पायाशी तुझं एक नातं दुरावलंय ना,मग आमच्याच पायाशी तुला तुझं हक्काचं नातं मिळेल...असे म्हणत स्वामी मल्हारी मार्तंड रूपात प्रकट होतात. हे तुझंच रक्त आहे फक्त जे तू नाकारलं होतंस असे स्वामी यावेळी कोणाला उद्देशून म्हणतात ? स्वामींची ही नेमकी लीला काय याचे अत्यंत भारावून टाकणारे, एक जगावेगळा जीवनसंदेश समोर आणणारे उत्तर, हे आवर्जून अनुभवण्यासारखे आहे. माया,ममता, वात्सल्य यांचा संगम असलेली ही अनोखी स्वामी लीला चुकवू नये अशी आहे.
या कथाभागात लोकप्रिय बालकलाकार शुभ्रा तिळगूळकर आणि यश वाकळे, गौरी आणि मार्तंडची भूमिका करत असून राजा राणीची जोडी फेम अभिनेता शिवशैलेश कोरडे आणि श्रुती कुलकर्णी हे खऱ्या आयुष्यातले दांपत्य त्यांच्या आईवडिलांची भूमिका करत आहेत. यासर्वच कलावंतांच्या अविस्मरणीय अभिनयाने हा कथाभाग लक्षणीय ठरला आहे.