Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कलाकारांची मांदियाळी असलेला 'जुनं फर्निचर'

*कलाकारांची मांदियाळी असलेला 'जुनं फर्निचर'* सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यावर न्याय, हक्क, कायदा लिहिलेले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.
दरम्यान या चित्रपटात समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यतिन जाधव 'जुनं फर्निचर'चे निर्माते आहेत. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ''जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.