स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष खेळाचे दिग्पाल लांजेकर यांच्याकडून आयोजन
March 29, 2024
0
*‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष खेळाचे दिग्पाल लांजेकर यांच्याकडून आयोजन*
ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजीमहाराजां प्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार, प्रसार कायम करीत असतात. ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून ज्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला, त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अलौकिक कार्य व विचार भावी पिढी समोर यावे, याकरिता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन पुण्यातील ‘स्वरूपवर्धिनी’ या आपल्या मातृसंस्थेसाठी नुकतेच केले. दिग्पाल लांजेकर यांनी मातृसंस्था स्व-रूपवर्धिनीच्या १५० वर्धकांना हा चित्रपट स्वखर्चाने दाखवला.
या विशेष शो ला श्री.सात्यकी सावरकर आणि श्री.रणजित सावरकर हे सावरकरांचे वंशज आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा श्रीमती मंजिरी मराठे, स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, संस्थेच्या सहकार्यवाह व महिला विभाग प्रमुख मंजुषाताई कुलकर्णी, महिला विभागाच्या पालक पुष्पाताई नडे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रणजित सावरकर यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सावरकरांवर चित्रपट काढावा अशी आशा व्यक्त केली. केवळ एका चित्रपटातून सावरकरांचे विचार पोहचवणं शक्य नाही. सावरकरांच्या विचारांचे अनेक पैलू समोर येणं गरजेचं असल्याचं मत रणजित सावरकर यांनी व्यक्त केलं. 'शिवनीती'च्या मदतीनेच सावरकरांनी आपल्या देशभक्तीची वाटचाल केली असं सांगत, ‘शिवराज अष्टका’ प्रमाणे सावरकरांवरील चित्रपटाची ‘पंचक’ मालिका दिग्पालने करावी अशी इच्छा सात्यकी सावरकर यांनी यावेळी बोलून दाखविली. देशाला घडविण्यासाठी सावरकर विचारांची ताकद आजच्या पिढीला समजणं आवश्यक आहे, असे सांगताना ‘सावरकर’ चित्रपट ती ताकद तुमच्यात निर्माण करेल, असा विश्वास मंजिरी मराठे यांनी व्यक्त केला.
‘विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे’ हे ‘स्वरूपवर्धिनी’चे ध्येयवाक्य आहे. या ध्येयवाक्याला जागूनच छत्रपतींच्या आशीर्वादाने पुढच्या पिढीला ‘सावरकर’ हा विचार समजून घेता यावा याकरीता विशेष शोसाठी पुढाकार घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.
पुणे शहराच्या पूर्व भागातील नागरी वस्ती-झोपडपट्टी परिसरातील मुलामुलींच्या विकासासाठी झटणारी ‘स्वरूपवर्धिनी’ ही पुण्यातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेतर्फे व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणे, मुलामुलींवर देशभक्तीचे व समाजसेवेचे संस्कार रुजविणे, हे ‘स्वरूपवर्धिनी’ चे उद्दिष्ट आहे.