*मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन*
March 18, 2024
0
*मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन*
*स्मरणरंजनाचा हृद्य सोहळा रंगणार*
नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी नाट्य मंदिर, नाट्यगृह येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या विशेष पुढाकाराने हा महोत्सव संपन्न होणार आहे.
या महोत्सवाअंतर्गत १९ मार्च ते २१मार्च अशा तीन दिवसीय विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफिलीचा विशेष सोहळा ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार २२ मार्चला सायंकाळी ७.०० वा. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. नाटयमहोत्सव आणि सांगीतिक मैफिल सोहळा रसिकांसाठी विनामूल्य आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे सुपुत्र अनिल कालेलकर यांनी हा महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
या महोत्सवात श्री. मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात’(१९ मार्च), ‘डार्लिंग डार्लिंग’ (२० मार्च), ‘नाथ हा माझा’ (२१ मार्च) या नाटकाचे सादरीकरण होईल. या नाटकांच्या सादरीकरणात एक अभिनव प्रयोग करण्यात येणार आहे . ‘दिवा जळू दे सारी रात’ तसेच ‘डार्लिंग डार्लिंग’या नाटकाचे तीन अंक तीन वेगळ्या नाट्यसंस्था सादर करणार आहेत. 'डार्लिंग 'डार्लिंग’ या नाटकाचा पहिला अंक पार्थ थिएटर्स, मुंबई यांच्या विद्यमाने दिग्दर्शक मंगेश सातपुते, दुसरा अंक श्री कलाधारिणी प्रॉडक्शन्स मुंबई दिग्दर्शक गणेश पंडीत, तिसरा अंक अनामय, मुंबई दिग्दर्शक देवेंद्र पेम सादर करणार आहेत. ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाचा पहिला अंक अभिनय, कल्याण यांच्या वतीने दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, दुसरा अंक व्हिजन व्हॉईस एनऍक्ट, मुंबई दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर तिसरा अंक माणूस फाऊंडेशन मुंबई दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर सादर करणार आहेत.
ख्यातनाम नाटककार, गीतकार, हिंदी- मराठी चित्रपट लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. मार्च २०२३-२०२४ हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मधुसूदन कालेलकरांना त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमासाठी १९६१ सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता .
मधुसूदन कालेलकर यांच्या बहुविध प्रतिभेचे पैलू उलगडत त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा महोत्सव रसिकांसाठी स्मरणरंजनाचा हृद्य अनुभव असणार आहे.