Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार स्टार प्रवाह चे , " छोटे उस्ताद -- 2 " चे सूत्रसंचालन

 लहानग्यांच्या सुरेल विश्वात हरवून जाण्याची अनोखी संधी

सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ चं सूत्रसंचालन



स्टार प्रवाहवर सुरु होतंय गाण्याचं दुसरं पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’. पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर लहानग्यांच्या सुरांची मैफल अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.   


सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली, ‘एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी छोटे उस्ताद च्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या मंचावरचं टॅलेण्ट पाहून मी भारावून गेले होते. इतका भरभरुन प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला. याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या पद्धतीचं टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होतं. इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे. सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे कारण इथे प्रसंगावधान राखावं लागतं. लहान मुलांसोबत जमवून घेणं आणि त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. 



मला लहान मुलं प्रचंड आवडतात त्यामुळे या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मी नेहमीच वेगवेगळे लूक्स आणि स्टाईल ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या सूत्रसंचालनाची सुरुवात स्टार प्रवाहमुळेच झाली. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता. सूत्रसंचालन ही कला आहे. स्टार प्रवाहने माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे अशी भावना वैदेहीने व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.