सारेगमप’च्या सुरेल प्रवासात मृण्मयी देशपांडे यांचा खास अनुभव, “संगीत हा धागा सगळ्यांना जोडून ठेवतो”
‘सारेगमप’च्या मंचावर स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवणं ही माझी जबाबदारी, मृण्मयी देशपांडेंचा सूत्रसंचालनामागचा खास दृष्टिकोन”
मृण्मयी देशपांडे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी आणि गुणी कलाकार म्हणून ओळखले जाणारे नाव आहे. अभिनयासोबतच नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कुंकू’, ‘एका पेक्षा एक’जोडीचा मामला, ‘अप्सरा आली’ यांसारख्या विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मृण्मयी देशपांडे सध्या ‘सारेगमप’च्या सुरेल मंचाचं सूत्रसंचालन करत आहेत. संगीताची विशेष आवड असलेल्या मृण्मयी यांच्यासाठी *‘सारेगमप’* हा केवळ एक कार्यक्रम नसून झी कुटुंबात पुन्हा घरच्यांसारखं येण्याचा आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणारा अनुभव आहे.
*याविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली* , “सारेगमपच्या मंचावर सूत्रसंचालन करण्याची पुन्हा संधी मिळतेय, यासाठी मी खूप आनंदी आहे. मला स्वतःला गाणी ऐकायला फार आवडतात. सारेगमपमध्ये सूत्रसंचालन करणं माझ्यासाठी झी कुटुंबात घरी परत आल्यासारखं आहे, कारण झी मराठीवर मी बऱ्याच मालिका आणि कार्यक्रम केले आहेत. माझ्या ‘कुंकू’ मालिकेनंतर ‘एका पेक्षा एक’, ‘जोडीचा मामला’, ‘अप्सरा आली’ आणि बरेच रिअॅलिटी शो मी केले. त्यानंतर ‘सारेगमप’चा प्रवास सुरू झाला. त्यामुळे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय आणि सुरेल प्रवास आहे. इथे खूप छान आणि आवडती गाणी ऐकायला मिळतात, अनेक आठवणी पुन्हा रंगतात. ‘सारेगमप’चं सूत्रसंचालन करताना एकदम मस्त आणि छान वाटतं.”
“प्रत्येक स्पर्धकाचं एक वेगळं स्वप्न आणि संघर्ष असतो. मला वाटतं, स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्यासोबतच आवाजात होणारा बदल खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या दिवशी असलेला स्पर्धकाचा आवाज, त्याचं गाणं आणि स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर त्याच्या गाण्यात झालेली प्रगती, वाढलेला आत्मविश्वास आणि स्टेजवर परफॉर्म करण्याची कला यामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतो. काही जण खूप छान गातात; पण सध्याच्या काळात व्यक्तिमत्त्व विकासही खूप महत्त्वाचा आहे. हे सगळं स्पर्धकांमध्ये आपोआपच विकसित होताना दिसतं. पहिल्या दिवसापासून फिनालेच्या आठवड्यापर्यंतचा हा प्रवास खूपच मजेशीर असतो.”
‘सारेगमप’ म्हटलं की मला कायम शूटिंगचा पहिला दिवस आठवतो. ‘सारेगमप’च्या सुरावटीलाच सुरुवात होते ना, तेव्हा मी खरंच आनंदी होऊन भारावून जाते. एखादी मालिका किंवा कार्यक्रम जेव्हा लिजेंडरी होतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी घडतात, ज्या प्रत्येक वेळी शब्दांत वर्णन करणं शक्य नसतं. माझ्यासाठी असाच एक अविस्मरणीय क्षण म्हणजे गुरुजी, म्हणजेच सुरेशजींसोबतचा अनुभव. ते चप्पा चप्प्यावर गात होते आणि आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत नाचत होतो. त्यांच्याकडून प्रत्यक्ष गाणी ऐकता आली, हा ‘सारेगमप’मधला माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.”
“संगीत हा धागा सगळ्यांना जोडून ठेवतो, हे ‘सारेगमप’वर सातत्याने अनुभवायला मिळतं. मला वाटतं, या नव्या पर्वात प्रेक्षकांमधून जे कोणी मराठी संगीतापासून थोडेसे दुरावले आहेत किंवा गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग ज्यांना आवडतात, जुन्या गाण्यांचं नव्या पद्धतीने सादरीकरण ज्यांना आवडतं, अशा सगळ्यांसाठी ही नवी पर्वणी नक्कीच खास असणार आहे. जुनी गाणी ज्यांना आवडतात, त्यांच्यासाठी हे पर्व पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं असेल. तसेच संगीतापासून दुरावलेले अनेकजण पुन्हा संगीताशी जोडले जातील, असं मला वाटतं. स्पर्धकांच्या प्रवासात सूत्रसंचालक म्हणून आपली भूमिका मृण्मयीसाठी तितकीच महत्त्वाची आहे. “स्पर्धक स्टेजवर येताना नेहमीच थोडे तणावात असतात. मी बराच वेळ स्पर्धकांसोबत असते, आम्ही गप्पा मारतो. लहान मुलांच्या बाबतीत तणाव कमी असतो; पण मोठ्या स्पर्धकांच्या बाबतीत ते थोडे तरी तणावात असतात. कधी कधी गात असताना एखाद्या स्पर्धकाची नजर आपल्यावर पडते आणि आपण त्यांचं गाणं एन्जॉय करतोय, त्यांच्या गाण्याला मनापासून दाद देतोय, ही एकच गोष्ट त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची असते. स्पर्धकांना सतत आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटत राहावं, ही मी माझी जबाबदारी समजते.”
‘सारेगमप’ने अनेक उत्तम गायकांना व्यासपीठ दिलं आहे. रिअॅलिटी शोच्या महत्त्वाबद्दल मृण्मयी म्हणतात, “सारेगमपने अनेक उत्तम गायकांना व्यासपीठ दिलं आहे. मला कायम वाटतं की प्रत्येक रिअॅलिटी शो हा महत्त्वाचा असतो. तळागाळात अनेक कला दडलेल्या असतात आणि अशा कलाकारांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकांना पाहता, ऐकता आणि अनुभवता येतं. त्यामुळे टेलिव्हिजन लोकांचं आयुष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. मी स्वतः याचं मोठं उदाहरण आहे. ‘कुंकू’ मालिकेनंतर माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदललं. मोठ्या स्पर्धकांचे सूर बऱ्याच काळापासून ‘सारेगमप’मधून ऐकायला मिळालेले नाहीत. मागील काळात लहान मुलांच्या स्पर्धा सातत्याने झाल्या. लहान मुलांनाही त्यांच्या वयामुळे काही मर्यादा असतात. त्यामुळे दर्जेदार गाणी, जशी ती मुळात आहेत तशीच ऐकायला मिळणं आणि संपूर्ण सेट सुरांनी भरून जाणं, यासाठी मी या पर्वाचा आनंद घेत आहे. हे नवं पर्व प्रेक्षकांनी गाण्यांसाठी तर नक्कीच पाहावं, पण त्यासोबतच मनसोक्त मजा घेण्यासाठीही पाहावं, असं मला वाटतं.”
‘ *सारेगमप’च्या या नव्या पर्वातून नव्या पिढीचा आवाज, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'सा रे ग म प' शनि - रवि रात्री ९.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर* .

