प्रसिद्ध गायक दिव्या कुमार यांच्या आवाजातील ‘बाप्पा माझा’ हे धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीस
*राजे यशोवर्धन, रितेश कांबळे आणि अंकिता मेस्त्री अभिनीत ‘बाप्पा माझा’ गाणं घेतंय गणेशभक्तांच्या मनाचा ठाव*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी एक नवा संगीतमय नजराणा घेऊन ‘वीरता प्रॉडक्शन’ पहिल्यांदाच सज्ज झालं आहे. गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या मनावर राज्य करायला ‘बाप्पा माझा’ हे नवं कोरं गाणं भेटीस आलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या चार दिवसांत या गाण्याने 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस हे गाणं उतरलं आहे.
या गाण्याच्या माध्यमातून राजे यशोवर्धन याने पदार्पण केलं असून, त्याच्यासोबत रितेश कांबळे आणि अंकिता मेस्त्री प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. गाण्याची कथा तीन गणेशोत्सवप्रेमी तरुणांभोवती फिरते. गणेशोत्सवाचे क्षण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून टिपण्यासाठी ते खेडेगावांत पोहोचतात. तिथे साधेपणाने आणि आपुलकीने साजरा होणारा गणेशोत्सव ते कॅमेऱ्यात कैद करतात. याचदरम्यान त्यांना गावातील एका शाळेची बिकट परिस्थिती आणि दुरुस्तीसाठी ठेवलेली दानपेटी दिसते. ही परिस्थिती पाहून ते शाळेच्या समस्यांचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करतात. पुढे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आणि बाप्पाच्या कृपेने त्या शाळेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मंजूर होतो. त्यामुळे भक्ती, उत्सव आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचा सुंदर संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक दिव्या कुमार यांच्या दमदार आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. तर तरुणाईचे लाडके संगीतकार-गीतकार प्रशांत नाकती आणि करण सावंत यांनी या गाण्याचे संगीत व बोल रचले आहेत. खेड्यापाड्यात साधेपणाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची सुंदर झलक दाखवणारं हे गाणं रोहित जाधव दिग्दर्शित असून, सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तर या गाण्याच्या निर्मितीची धुरा स्मिता वीरेंद्रसिंग यांनी सांभाळली आहे.
‘बाप्पा माझा’ या गाण्याचे बोल आणि संगीत बाप्पाच्या भक्तांना ठेका धरायला लावतंय, यात शंकाच नाही. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासोबतच एका सकारात्मक सामाजिक संदेशाची सांगड घालणारं हे गाणं अवघ्या चार दिवसांत 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार करत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.


