Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘मैत्रीच्या पल्याड…’ नात्यांची चाहूल देत ‘मैत्रेया’चे नवे पोस्टर प्रदर्शित!

 ‘मैत्रीच्या पल्याड…’ नात्यांची चाहूल देत ‘मैत्रेया’चे नवे पोस्टर प्रदर्शित!

२३ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मैत्रीच्या नात्यातील खास बॉण्डिंग वाढवणारे ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे समोर आले नव्हते. आता मात्र नव्या पोस्टरमधून समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार प्रमुख कलाकारांचे चेहरे पहिल्यांदाच समोर आले असून, त्यांचे खास नाते या पोस्टरमधून पाहायला मिळते.



पोस्टरमध्ये दिसणाऱ्या चौघांच्या चेहऱ्यांवरील आनंद आणि त्यांच्यातील सहजता पोस्टरला फ्रेश आणि उत्साही अंदाज देतात. एकमेकांशी असलेली जवळीक, मस्ती आणि नात्याचा सुंदर बॉण्ड पोस्टरमधून जाणवतो. समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार कलाकारांची या पोस्टरमधून प्रेक्षकांशी ओळख झाली असून, पोस्टरसोबत ऐकू येणाऱ्या बॅकग्राऊंड म्युझिकमधील ‘मैत्रीच्या पल्याड हा मैत्रेया…’ हे शब्दही लक्ष वेधून घेत आहेत. या शब्दांमधूनच ‘मैत्रेया’ हा केवळ मैत्रीपुरता मर्यादित न राहाता, मैत्रीच्या पलीकडे जाऊन नात्यांमधील भावनिक गुंतागुंत उलगडणारा चित्रपट असल्याचे संकेत मिळतात. मैत्री, जवळीक आणि त्यापलीकडे असलेल्या भावनांचा प्रवास या चित्रपटातून कशा पद्धतीने उलगडणार, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


‘मैत्रेया’ची आणखी एक जमेची बाजू म्हणजे संगीतकार पंकज पाडघन यांचे श्रवणीय संगीत. चित्रपटाच्या कथेला आणि भावविश्वाला साजेसे संगीत या चित्रपटाच्या अनुभवात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘काकण’ नंतर लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा एकदा नवी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. ‘मैत्रेया’मधील कलाकारांचा लूक मॉडर्न आणि जेन झी पिढीला साजेसा असला, तरी या चित्रपटाची कथा आणि पार्श्वभूमी मध्यमवर्गीय मुळांना धरून बांधण्यात आली आहे. त्यामुळे मॉडर्न दिसणाऱ्या या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील नाती, भावना आणि अनुभव यांचा प्रवास प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आहे. 


लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “ ‘मैत्रेया’ या चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची या चौघांमधली नातं हा या कथेचा महत्त्वाचा भाग आहे. मैत्रीचं नातं जितकं सहज वाटतं, तितकंच त्यात अनेक भावना आणि अनुभव दडलेले असतात. ‘मैत्रेया’मधून याच नात्याचा एक वेगळा प्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चारही कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना खूप सुंदर पद्धतीने साकारलं आहे. त्यांची ही गोष्ट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”


निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “‘मैत्रेया’ हा केवळ तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून केलेला चित्रपट नाही. आजच्या पिढीच्या भावविश्वासोबतच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपलासा वाटेल, असा हा चित्रपट आहे. मनोरंजनासोबतच नात्यांकडे पाहाण्याचा एक सुंदर आणि सहज दृष्टिकोन या चित्रपटातून मांडला आहे. त्यामुळे ‘मैत्रेया’चा अनुभव तरुणांनीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन घ्यावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. मोठ्या पडद्यावर हा अनुभव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.”


‘मैत्रेया’ या चित्रपटाचे सह निर्माते अमन खळतकर आहेत. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.