Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पडद्यावरच्या व्यक्तिरेखांपासून खऱ्या आयुष्यातील विचारांपर्यंत; कमळी आणि ज्योतीने सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

पडद्यावरच्या व्यक्तिरेखांपासून खऱ्या आयुष्यातील विचारांपर्यंत; कमळी आणि ज्योतीने सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ


स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडण्याचे धैर्य, आपल्या स्वप्नांसाठी उभे राहण्याची ताकद आणि त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणेही आहे. आजच्या काळात मनोरंजनाच्या माध्यमातून पडद्यावर साकारल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर प्रभाव टाकताना दिसतात. आपल्या आवडत्या कलाकारांच्या भूमिका पाहताना प्रेक्षक त्यांच्या संघर्षाशी, विचारांशी आणि स्वप्नांशी जोडला जातो.



*‘कमळी’* या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून *अभिनेत्री विजया बाबर* ने आपल्या हक्कांसाठी, स्वप्नांसाठी आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्यासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या मुलीची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली आहे. तिच्या व्यक्तिरेखेने केवळ तरुण तरुणींनाच नाही, तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना प्रेरणा दिली आहे. दुसरीकडे, ‘ *दीपज्योती’* मधील ज्योती, म्हणजेच *अभिनेत्री पूर्वा कौशिक* , ही देखील आपल्या विचारांवर ठाम राहणारी आणि आपल्या माणसांसाठी लढणारी व्यक्तिरेखा आहे. पडद्यावर या दोन्ही व्यक्तिरेखा स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढताना दिसतात. याच विचारांची झलक या दोन्ही कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील विचारांमध्येही पाहायला मिळते.


विजया बाबर आणि पूर्वा कौशिक यांनी स्वातंत्र्याचा त्यांच्यासाठी असलेला अर्थ, बदलता भारत, आजच्या पिढीचा दृष्टिकोन आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याबद्दल आपले विचार मांडले.


*‘कमळी’ म्हणजेच विजया बाबर* ने सांगितले, “डिजिटल क्रांतीमुळे आज प्रत्येक सामान्य माणसाला स्वतःचे विचार मांडण्याची आणि पुढे जाण्याची समान संधी मिळाली आहे. जिथे शिक्षण पोहोचत नव्हते, तिथला विद्यार्थीही या क्रांतीमुळे अनेक गोष्टी शिकू आणि समजून घेऊ शकतो. ही खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे.आजचा भारत आपल्या संस्कृतीवर अधिक अभिमान बाळगत आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिकांमध्ये केवळ काल्पनिक गोष्टींपेक्षा आपल्या घरातल्या, आपल्या मातीशी जोडलेल्या आणि खऱ्या आयुष्यातील कथा अधिक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कलाकारांसोबत प्रेक्षकही घडत जातोय, हे चित्र नक्कीच आशादायी आहे. आपल्यासाठी स्वातंत्र्याची व्याख्या सांगताना विजया म्हणाली , “स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही भीतीशिवाय मनमोकळेपणे जगणे. एक कलाकार म्हणून मी कोणत्याही एका बाजूची व्याख्या न करता मानवी भावना जशा आहेत, तशा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते. आजची स्त्री कणखर आणि अभ्यासू आहे, पण त्याचबरोबर ती भावनाशीलही आहे. या दोन्ही बाजू मला महत्त्वाच्या वाटतात.नवीन पिढीने कितीही प्रगती केली तरी आपल्या माणसांचा आदर करावा, स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवावे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे. आपल्या प्रत्येक निर्णयाने समाज घडत असतो. आपण स्वतःच समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे योग्य बदलाची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी, हा विचार प्रत्येकाच्या मनात असावा.”


*‘ज्योती’म्हणजेच पूर्वा कौशिक* च्या मते, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा सकारात्मक बदल म्हणजे स्वतःचे मत मांडण्याचा वाढलेला आत्मविश्वास. मला वाटतं, माणसं हल्ली बोलायला लागली आहेत. स्वतःचं मत मांडण्यासाठी बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागली आहेत. हा लोकशाहीचाच एक भाग आहे आणि सध्याच्या काळात हा खूप मोठा आणि गरजेचा सकारात्मक बदल आहे. सोशल मीडियामुळे आजच्या पिढीला अनेक विषयांवर व्यक्त होण्याची संधी मिळते, आजच्या पिढीकडे सोशल मीडियाची ताकद आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होता येतं आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करता येते. लोकशाही, राजकारण, शिक्षण, रोजगार असे अनेक विषय मांडता येतात. आजूबाजूला काय चांगलं किंवा वाईट घडतंय, याची माहितीही मिळते. त्यामुळे जागरूक राहण्यास मदत होते.

माझ्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट आहे. माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे मला माझं मत स्पष्टपणे मांडता येणं. मी थोडीशी बंडखोर वृत्तीची मुलगी आहे आणि माझ्या भूमिकांमधूनही माझी ही बंडखोरी दाखवण्याचा प्रयत्न करते. मात्र, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. त्यासोबत जबाबदारी आणि जागरूकताही असते. नवीन पिढी स्वतःच्या स्वप्नांबद्दल आणि मतांबद्दल खूप ठाम आहे, ही गोष्ट मला आवडते. आपल्या स्वप्नांसाठी ती धाडसाने पुढे जाते. मात्र, आपल्या अधिकारांसाठी बोलताना आपल्या शब्दांमुळे किंवा कृतीमुळे कोणाचा अपमान तर होत नाही ना, याची जाणीवही त्यांना असायला हवी. स्वतःसाठी उभं राहताना इतरांचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”



स्वातंत्र्यदिन केवळ स्वातंत्र्य साजरे करण्याचा नाही, तर स्वातंत्र्याचा योग्य अर्थ समजून घेऊन तो जबाबदारीने अमलात आणण्याची गरज आहे. 

 

*तेव्हा बघायला विसरू नका 'कमळी' आणि 'दीपज्योती' सदैव तुमच्या झी मराठी वाहिनी वर*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.