Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तगड्या कलाकारांच्या फौजेसोबत ‘अफरातफरी’चं मोशन पोस्टर प्रदर्शित!

 पैशांच्या खेळात रंगणार ‘अफरातफरी’!

तगड्या कलाकारांच्या फौजेसोबत ‘अफरातफरी’चं मोशन पोस्टर प्रदर्शित!



नोटांचा पाऊस, त्यांच्या मागे लागलेली माणसं, पोलिसांची धावपळ आणि या सगळ्यातून उडालेला गोंधळ… हे सगळं पाहायला मिळतंय ‘अफरातफरी’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये. पैशांचा हा मामला नेमका काय आहे आणि त्यासाठी एवढी धावपळ का सुरू आहे, याची उत्सुकता या मोशन पोस्टरने निर्माण केली आहे. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित, अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेला हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मोशन पोस्टरमध्ये गावाकडची पार्श्वभूमी आणि हवेत उडणाऱ्या नोटांसोबत एकामागोमाग एक पात्रं धावताना दिसतात. कुणाच्या हातात बंदूक, कुणाच्या चेहऱ्यावर चिंता, तर कुणी पैशांच्या मागे सुसाट धावतंय… आणि या सगळ्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर ‘सोड चिंता असते ती चितेसमान, कर्म कर, तू ठेव गीतेचा मान’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते, फळाची चिंता सोडून दे’ या गीतेतील ओळी ऐकू येतात. मोशन पोस्टरमधील या ओळी आणि त्याला जोडलेला पैशांचा गोंधळ यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दलचं कुतूहल आणखी वाढतं. या सगळ्या गोंधळामागचं कारण काय आणि या पैशांमुळे कोणाच्या आयुष्यात काय उलटापालट होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.


‘अफरातफरी’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात एकापेक्षा एक दमदार कलाकार एकत्र आले आहेत. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची रंगत आणि पैशांभोवती फिरणारी गंमतीदार कथा यामुळे ‘अफरातफरी’चा हा गोंधळ प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.



दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, ‘’ ‘अफरातफरी’ हा मनोरंजनाने भरलेला चित्रपट आहे. पैशांभोवती फिरणाऱ्या या कथेत अनेक पात्रं आणि त्यांच्या वाट्याला येणारे मजेशीर प्रसंग यामुळे परिस्थिती अधिकच गुंतत जाते. मोशन पोस्टरमधून या गोंधळाचा अंदाज येतो. कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री, विनोद आणि सतत रंगणारी धावपळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.