Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*तरुणाईच्या उत्साहात रंगला ‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा म्युझिक लॉन्च!*

 *तरुणाईच्या उत्साहात रंगला ‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा म्युझिक लॉन्च!*

पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत जल्लोषात झाला गाण्याचा अनावरण सोहळा



मराठीतील आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. भन्नाट कथा, नव्या पिढीतील लोकप्रिय कलाकार आणि हटके सादरीकरणामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच चित्रपटातील ‘पैशाचा पाऊस’ रॅप प्रदर्शित झालं असून, त्याचा म्युझिक लॉन्च रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि जल्लोषात पार पडला.


या खास कार्यक्रमासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम महाविद्यालयात उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी कलाकारांचं जोरदार स्वागत केलं. गाणं प्रदर्शित होताच सगळीकडे एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी गाण्याच्या तालावर नाचू लागले, जल्लोष करू लागले आणि संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भूतम भयम्’ मधील गाण्यावर खास डान्स सादर करून टीमला सुखद सरप्राइज दिलं. कलाकारांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत अनेक सुंदर क्षण अनुभवले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ‘पैशाचा पाऊस’ रॅपने तरुणाईची पसंती मिळवल्याचं स्पष्ट दिसून आलं.


या रॅपमधून सात मित्रांची धमाल मैत्री पाहायला मिळते. भन्नाट बीट्स, हटके रॅप आणि पिक्चरायझेशनमुळे हे गाणं पहिल्याच ऐकण्यात लक्ष वेधून घेतं. या गाण्याचे बोल श्रेयस सागवेकर आणि श्रीनाथ म्हात्रे यांनी लिहिले असून, संगीत श्रीनाथ म्हात्रे यांनी दिलं आहे. ‘तांबडी चामडी’ या गाण्यामुळे घराघरांत पोहोचलेला फेमस रॅपर श्रेयस सागवेकर याने ‘पैशाचा पाऊस’ रॅपला आपला दमदार आवाज दिला आहे.


यावेळी दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “‘भूतम भयम्’ हा चित्रपट तरुणाईची मैत्री, त्यांची धमाल आणि त्यांची भन्नाट एनर्जी पडद्यावर घेऊन येतो. ‘पैशाचा पाऊस’ रॅप ही त्याच ऊर्जेची झलक आहे. त्यामुळे हे गाणं थेट विद्यार्थ्यांसमोर लॉन्च करायचं आम्ही ठरवलं. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांचा जल्लोष पाहून आम्हाला खात्री वाटली की हे गाणं आणि चित्रपट दोन्ही तरुणांच्या मनात घर करतील.”


गायक श्रेयस सागवेकर म्हणाला, “‘पैशाचा पाऊस’ रॅप करताना आम्ही तरुणाईची भाषा, त्यांचा स्वॅग आणि त्यांची एनर्जी गाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. कॅालेजमध्ये  विद्यार्थ्यांसोबत हे गाणं अनुभवणं खूप खास होतं. त्यांनी दिलेला प्रतिसाद, त्यांनी केलेला डान्स आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमच्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं. हा अनुभव कायम लक्षात राहील.”



झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केलं आहे. नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे चित्रपटाचे निर्माते असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ अर्थात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांची धमाल टीम पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.