Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हे मौन नाही, भावनांचा आवाज आहे! झी मराठी पुन्हा एकदा रचणार टेलिव्हिजनवर इतिहास

हे मौन नाही, भावनांचा आवाज आहे! झी मराठी पुन्हा एकदा रचणार टेलिव्हिजनवर इतिहास

*"कधी कधी शांत राहणंही गरजेचं असतं..." – सुबोध भावे*

*'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये टेलिव्हिजनवरील पहिला 'नो-डायलॉग' एपिसोड"*




नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण सादर करत टेलिव्हिजन विश्वात नवा पायंडा पाडणारी झी मराठी आता आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच *'वीण दोघातली ही तुटेना'* मालिकेत संपूर्ण *'नो-डायलॉग' (मौन) एपिसोड* प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हा प्रयोग केवळ वेगळा नाही, तर संपूर्ण चॅनेल, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांसाठी मोठं आव्हानही आहे. एकही संवाद न वापरता केवळ अभिनय, हावभाव, देहबोली, पार्श्वसंगीत आणि भावनांच्या माध्यमातून संपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.


या विशेष भागात आधिरा घरातून रुसून समरच्या घरी येते. तिच्या आणि रोहनमधील अबोला वाढत जातो. समर आणि स्वानंदी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. स्वानंदीदेखील काही काळ कोणाशीही न बोलण्याचा निर्णय घेते. दरम्यान, रोहन आधिराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर घरात एक गोंधळ उडतो. एक चोर घरात शिरतो. आता पुढे काय होणार?


*या विशेष भागाविषयी सुबोध भावे (समर) आणि तेजश्री प्रधान (स्वानंदी) म्हणाले* , "हा पूर्णपणे मौन भाग आहे. या भागात कोणीही कोणाशी बोलत नाही. या भागाची पार्श्वभूमी आधीच्या भागांमध्ये तयार झाली आहे. एकही संवाद न वापरता संपूर्ण भाग सादर करणं हे मोठं धाडस आहे आणि झी मराठीने ते धाडस केलं आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टीम हा भाग प्रामाणिकपणे आणि उत्तमरित्या साकारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. अंतिम भाग कसा तयार होईल आणि प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतील याची उत्सुकता आम्हालाही आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेचा आम्ही खूप आनंद घेत आहोत. केवळ काहीतरी वेगळं करायचं म्हणून हा प्रयोग नाही. कथेने आम्हाला या टप्प्यावर आणलं आहे आणि प्रत्येक पात्र का बोलत नाही, यामागे ठोस कारण आहे. कलाकार म्हणून हा आमच्यासाठीही पहिलाच अनुभव आहे. संवादांशिवाय केवळ देहबोली, नजरा आणि हावभावातून भावना व्यक्त करणं हे खूप आव्हानात्मक आहे. प्रत्येक क्षणी स्वतःच्या बॉडी लँग्वेजची जाणीव ठेवावी लागते. कधी कधी शांत राहणंही गरजेचं असतं. सतत बोलत राहिलं की शब्दांची किंमत कमी होते. काही काळ शांतता अनुभवली की पुन्हा एकमेकांशी बोलावंसं वाटतं आणि तेव्हाच ते बोलणं खरं आणि मनापासून होतं. जी कला आम्ही सादर करतो, ती कुठेतरी आपल्या आयुष्याचाच एक भाग असते. त्याच आयुष्यातल्या गोष्टी आम्ही या कथेतून पेरतो आणि प्रेक्षकांसमोर सादर करतो."




*हा आगळावेगळा मौन भाग पाहायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना', २९ जुलै संध्याकाळी ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर."*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.