निसर्गाच्या सान्निध्यात रंगणार मराठी कलाकारांची ‘झिम्माड’ पावसाळी पिकनिक
पावसाच्या सरींनी राज्यभरातील वातावरण प्रसन्न केलं असून, सर्वत्र हिरवाईची चादर पसरली आहे. अशा आल्हाददायक वातावरणात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही पावसाळ्याचा आनंद एका वेगळ्याच अंदाजात साजरा करणार आहेत.
अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याने ‘झिम्माड’ या खास पावसाळी पिकनिकचे आयोजन केले असून, पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ या आलिशान ठिकाणी हा मैत्रीसोहळा रंगणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात नाच-गाणी, धमाल खेळ, गप्पा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि भरपूर मस्तीचा रंगतदार मेळा यावेळी अनुभवायला मिळणार आहे.
पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या मनात काही ना काही सुंदर आठवणी जाग्या होतात. शाळा-कॉलेजच्या दिवसांतील मित्रमैत्रिणींसोबतच्या पावसाळी सहली, धम्माल आणि अविस्मरणीय क्षण आजही प्रत्येकाच्या स्मरणात असतात. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे अशा निवांत भेटी आता दुर्मिळ झाल्या आहेत. हाच धागा पकडत पुष्कर श्रोत्रीने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना एकत्र यायचं आवाहन केलं आणि त्याच्या आवाहनाला ६० हून अधिक कलावंतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा पावसाळ्याचा आनंद एकत्र अनुभण्यासाठी हे कलाकार ऑगस्ट महिन्यात ‘झिम्माड’ या पावसाळी पिकनिकसाठी मुंबई बाहेर जाणार आहेत.
दैनंदिन चित्रीकरण, प्रवास आणि विविध प्रोजेक्ट्सच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा विरंगुळा मिळावा आणि कलाकारांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवता यावा, हे झिम्माडचं उद्दिष्ट आहे. सेटवरील भेटींपलीकडे जाऊन निवांत वातावरणात गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटण्याची संधी या निमित्ताने कलाकारांना मिळणार आहे.
या पावसाळी पिकनिकचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आशा काळे, लीला गांधी, फैय्याज, मोहन आगाशे, मोहन जोशी तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे यांना कलाकारांच्या वतीने कृतज्ञता सन्मान देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा अर्पण करण्यात येणार आहे.
या पावसाळी सहलीबद्दल अभिनेते पुष्कर श्रोत्री म्हणाले, “पावसाळा हा प्रत्येकाचाच आवडता ऋतू असतो. कामाच्या व्यापातून थोडा वेळ बाजूला ठेवून सगळे कलाकार एकत्र येऊन निवांत गप्पा मारणार, गाणी गाणार, नाचणार आणि भरपूर धमाल करणार आहोत. अशा भेटींमुळे मैत्री अधिक घट्ट होते आणि कामाचा ताणही हलका होतो. या पावसाळी पिकनिकची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत.”
एक दिवसाच्या या सहलीची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकारामध्ये या अनोख्या उपक्रमाबद्दल विशेष उत्सुकता आहे. दरवर्षी रंगणाऱ्या ‘चिरायु’ (हिंदू नववर्ष स्वागत सोहळा) आणि रंगकर्मींच्या होळीप्रमाणेच, यंदापासून ‘झिम्माड’ पावसाळी सहल हीदेखील मराठी कलाकारांची वार्षिक परंपरा बनवण्याचा मानस पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार निसर्गाच्या सान्निध्यात एकत्र येणार असल्याने या सहलीची उत्सुकता वाढली आहे. मनोरंजन विश्वातील धावपळीच्या आयुष्यात असे निवांत क्षण कलाकारांसाठी ताजेतवाने करणारे ठरत असतात. त्यामुळे यंदाची ही ‘झिम्माड’ पावसाळी सहल केवळ विरंगुळ्यापुरती मर्यादित न राहाता, मैत्री, संवाद, कृतज्ञता आणि आनंदाचा एक संस्मरणीय सोहळा ठरणार आहे.

