Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कृष्णानदीच्या निसर्गरम्य वातावरणात ‘कृष्णाईच्या लेकी’ची प्रेक्षकांशी पहिली भेट*

*संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ*

*कृष्णानदीच्या निसर्गरम्य वातावरणात ‘कृष्णाईच्या लेकी’ची प्रेक्षकांशी पहिली भेट*




*झी मराठी* च्या नव्याने दाखल होणाऱ्या *‘कृष्णाईच्या लेकी’* या मालिकेच्या निमित्ताने कृष्णानदीच्या निसर्गरम्य वातावरणात, संगममाऊली येथे विशेष पत्रकार परिषद आणि प्रेक्षक भेटीचे आयोजन करण्यात आले. कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेला हा घाट मनमोहक वातावरणासाठी ओळखला जातो. हिरवाईने नटलेला परिसर, नदीचे शांत पात्र आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली.

‘कृष्णाईच्या लेकी’ ही एका आई आणि तिच्या तीन मुलींची हृदयस्पर्शी कथा आहे. कुटुंब, नाती, संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथ यांची गोष्ट सांगणारी ही मालिका कोल्हापूरच्या कृष्णाईच्या मातीत चित्रित झाली आहे. त्यामुळे या मालिकेच्या शुभारंभासाठी संगममाऊली सारख दुसरं स्थान नाही. जस नद्यांचा संगम एकतेचा संदेश देतो तसेच मालिकेतील 'कृष्णाई' आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते.


कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी कृष्णा नदीची आरती करून झाली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि पत्रकारांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती. आतापर्यंत फक्त प्रोमोमध्ये आणि टीव्ही वर पाहिलेले कलाकार प्रत्यक्ष भेटल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अनेकांनी कलाकारांसोबत फोटो काढले आणि संवाद साधला. यानंतर मालिकेतील कलाकार *एकता लब्दे (शारदा), ट्विंकल यादव (गौरी), नारायणी वर्ने (सौदामिनी), रोहित परशुराम (शंकर) आणि स्मिता सरवदे (सत्यभामा )* यांनी आपल्या व्यक्तिरेखांविषयी चर्चा केली. मालिकेत कृष्णाईची भूमिका साकारणाऱ्या *निवेदिता सराफ* यांनी कथेचा गाभा, व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये आणि प्रेक्षकांना या कथेशी कसे सहज नाते जोडता येईल याबद्दल मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांनी सर्व उपस्थितांना मिठाईच्या खास डब्बे  वाटप केले. खानावळ चालवणारी कृष्णाई जशी गोडधोडाशिवाय कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करत नाही, त्याचप्रमाणे आपल्या प्रेक्षकांसोबतच्या या नव्या प्रवासाची सुरुवातही गोड आठवणींनी करण्यात आली.


*कलाकारांनी आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं*, "संगममाऊली घाटावर झालेला ही प्रेस मीट आमच्यासाठी खूप खास होती. मालिकेच्या सुरुवातीचे अनेक महत्त्वाचे प्रसंग आम्ही याच परिसरात चित्रित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणं म्हणजे अनेक सुंदर आठवणींना उजाळा देण्यासारखं होतं. कृष्णा नदीचा शांत प्रवाह, निसर्गरम्य वातावरण आणि गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम यामुळे हा अनुभव आणखी संस्मरणीय झाला. प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या उत्साहाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. मालिकेला मिळणारं हे प्रेम पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो असून, ‘कृष्णाईच्या लेकी’ प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल याची खात्री वाटते."




*तेव्हा पाहायला विसरू नका 'कृष्णाईच्या लेकी', १५ जूनपासून दररोज संध्या ७ वा., सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.