Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘तुंबाडची मंजुळा’मधील ओम भुतकरच्या भूमिकेचं होतंय कौतुक*

 *मंजुळाच्या झपाट्यात अडकला केशव ?*


*‘तुंबाडची मंजुळा’मधील ओम भुतकरच्या भूमिकेचं होतंय कौतुक*

 

झी स्टुडिओज निर्मित आणि विविध कोरगांवकर दिग्दर्शित या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रहस्य, विनोद आणि लोककथांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती गूढ ‘मंजुळा’ची आणि केशवच्या आयुष्यात घडणाऱ्या अनाकलनीय घटनांची. चित्रपटाच्या पोस्टरमधील साडीतील केशवचा आगळावेगळा लूक आणि त्यामागचं रहस्य प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण करत आहे. 

 


सध्या तरुण वर्गामध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता ओम भुतकर आपल्या प्रत्येक भूमिकेतून काहीतरी वेगळं सादर करण्यासाठी ओळखला जातो. ‘तुंबाडची मंजुळा’मध्ये त्याने साकारलेला केशव हा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. चित्रपटात केशवला ‘मंजुळा’ झपाटते आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कथानकाला वेगळंच वळण मिळतं. साडीतील त्याचा अनोखा लूक, बदललेली देहबोली, प्रभावी संवादफेक आणि गूढतेने भरलेलं सादरीकरण यामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

 

विनोदी प्रसंगांपासून रहस्यमय घटनांपर्यंत आणि भावनिक क्षणांपासून कथानकातील महत्त्वाच्या वळणांपर्यंत प्रत्येक दृश्यात ओम भुतकरचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. त्याचबरोबर ‘मंजुळा’चं गूढ आणि तिचा केशवशी असलेला संबंध याबाबतही प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. सोशल मीडियावर साडीतील केशवच्या लूकची तसेच चित्रपटातील रहस्यमय घडामोडींची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.  

 

याबद्दल ओम भुतकर म्हणतो की, प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद मनाला सुखावणारा आहे. आपण केलेलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहचतंय आणि त्यांना ते आवडतंय ही अतिशय आनंदाची बाब आहे. ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक अशीच होती आणि ती करताना मला खूप मजा आली.  

 

याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक विविध कोरगांवकर म्हणतात, ‘’मंजुळा ही व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकाचा आत्मा आहे. ही भूमिका साकारण्यासाठी अभिनयातील प्रचंड विविधता आणि धाडस आवश्यक होतं. ओम भुतकरने या भूमिकेसाठी अफाट मेहनत घेतली. शूटिंगदरम्यानही त्याचं या व्यक्तिरेखेशी एकरूप होणं आम्ही जवळून अनुभवलं आहे. आज प्रेक्षकांकडून त्याच्या अभिनयाला मिळणारं प्रेम, कौतुक आणि प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.” 

 

झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केले असून, कथा आणि पटकथा ऋषिकेश तुरई यांची आहे. बवेश जानवलेकर निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, अथर्व रुके, प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रहस्य, विनोद आणि लोककथांचा अनोखा संगम असलेला ‘तुंबाडची मंजुळा’ सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.