Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गीत ध्वनीमुद्रणाने 'लाईव्ह' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त...

 गीत ध्वनीमुद्रणाने 'लाईव्ह' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त...


आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियाच्या काळात 'लाईव्ह' गोष्टी पाहण्याला खूप महत्त्व आले आहे. आता हेच 'लाईव्ह' चित्र प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे, पण ते कसे हे आगामी मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना समजणार आहे. 'लाईव्ह' शीर्षक असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने करण्यात आला आहे.



रिद्धी बिद्धी व्हिजन या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे 'लाईव्ह' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. छबी असीम हल्दर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. संजीव राय यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, त्यांनीच दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. संजीव राय यांनी पूनम विभूते यांच्या साथीने चित्रपटाचे संवादलेखनही केले आहे. अंधेरी येथील रेकॉर्डिंग पंचम स्टुडिओमध्ये 'लाईव्ह'मधील मुहूर्ताचे गाणे रेकॅार्ड करण्यात आले. याप्रसंगी गायक, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. गीतकार महालिंग कंठाळे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी सुमधूर संगीत दिले आहे. गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या सुरेल आवाजात 'स्वप्न सुंदरी...' हे या चित्रपटातील महत्त्वाचे गाणे ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे. 


या चित्रपटात प्रेक्षकांना नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट पाहायला मिळेल. चित्रपट पाहताना ही कथा कुठेतरी आपल्याच आजूबाजूला घडलेली असावी असे प्रेक्षकांना जाणवेल. कारण या चित्रपटाचा विषय युनिव्हर्सल आहे. समाजातील विचार आणि व्यवस्थेवर निशाणा साधत आजवर कधीही न समोर आलेले चित्र सादर करण्याचे आव्हान या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक संजीव राय आणि त्यांच्या टिमने स्वीकारले आहे. आशयघन कथानकाला सुमधूर गीत-संगीताची किनारही जोडण्यात येणार आहे. 


मुहूर्ताला ध्वनीमुद्रित करण्यात आलेल्या गाण्याबाबत संगीतकार दिनेश अर्जुना म्हणाले की, संजीव राय यांनी लिहिलेल्या कथानकात 'स्वप्न सुंदरी...' हे गाणे अगदी मोक्याच्या प्रसंगी येते. महालिंग कंठाळे यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण शब्दरचनेला डॅा. नेहा राजपाल यांनी आपल्या सुमधूर आवाजाने अचूक न्याय दिला आहे. सहजसुंदर चाल असलेले कथानकाला गती प्रदान करणारे हे गाणे अगदी सहज प्रेक्षकांच्या ओठांवर रुंजी घालेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.



डिओपी गोपी या चित्रपटाचे छायालेखक असून, कला दिग्दर्शनाची जबाबदारी सैफुद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक झा या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. या चित्रपटात मराठीतील दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार असली, तरी त्याबाबतची माहिती सध्या तरी गुप्त ठेवण्यात आली आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.