Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल !*

 *दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल !*

*‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत*


झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती आणि आता या टीझरने त्या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक सिनेमा ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन अनुभवावा, असा हा चित्रपट असल्याची झलक टीझर देतो.



टीझरमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन भिन्न कुटुंबांची झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरा जपणारे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी, दोघेही काहीतरी ‘प्लॅन’ आखताना दिसत आहेत. नेमका हा प्लॅन कशासाठी आहे? हा गोंधळ नेमका कशाचा आहे? या दोन विचारसरणींची टक्कर कोणत्या वळणावर जाऊन भिडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहेत.


एका घराच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला हा संघर्ष केवळ दोन कुटुंबांची नसून दोन पिढ्यांचा, दोन विचारसरणींचा आणि दोन जीवनशैलींचा आहे, हे टीझरमधून दिसतेय.


नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर सादरकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एवढ्या भल्या मोठ्या कलाकारांच्या फौजेमुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरणार असून, प्रत्येकाची वेगळी शैली आणि विनोदी टायमिंग चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार आहे.


दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात,

“टीझर हा आमच्या चित्रपटाच्या स्वभावाची पहिली खरी झलक आहे. एका घरातल्या दोन भिन्न विचारसरणी जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा निर्माण होणारा गोंधळ, विनोद आणि त्यामागची भावनिक बाजू आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडली आहे. ‘सुपर डुपर’ हा विनोदी चित्रपट आहे, याशिवाय नात्यांमधल्या आपुलकीचा, पिढ्यांमधल्या अंतराचा आणि त्या अंतरावर मात करण्याच्या प्रवासाचा चित्रपटही आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये येऊन हा अनुभव घ्यावा, हीच अपेक्षा.”


या चित्रपटाबद्दल झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘’ ‘सुपर डुपर’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची धमाल कौटुंबिक कथा आहे . यातील एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि निर्मिती मूल्ये या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट सरस झाला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज यातून प्रेक्षकांना मिळेल हे नक्की."


पोस्टरनंतर आता टीझरनेही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली असून ३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हा कौटुंबिक महासोहळा ठरणार, यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.