Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित*

 *आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित*



आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसून, ते अनुभव, आठवणी, संस्कार आणि न बोललेल्या भावनांनी विणलेलं असतं. कधी अतूट जिव्हाळ्याचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे निर्माण झालेल्या अंतराचं… तरीही अंतर्मनाने कायम एकमेकांशी घट्ट बांधलेलं. या नात्याच्या अशाच नाजूक, हळुवार आणि खोल छटा उलगडणारा ‘तिघी’ हा आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनाला अलगद स्पर्श केला आहे.


अवघ्या काही क्षणांच्या या टीझरमधून एका घरातल्या तीन स्त्रियांच्या भावविश्वाची प्रभावी झलक अनुभवायला मिळते. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील दुरावा, न बोललेल्या भावना, तणाव, आठवणी आणि तरीही त्या सगळ्याच्या पलीकडे असलेले प्रेम हे सगळं अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने टीझरमध्ये मांडण्यात आलं आहे. कोणताही भडकपणा न करता, शांततेतून उलगडणाऱ्या भावनांचा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.


‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही चित्रपटाची टॅगलाईनच त्याचा आत्मा सांगून जाते. आठवणींनी भरलेलं घर आणि त्या घरातल्या ‘तिघीं’चं अंतर्मन हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. घर हे केवळ वास्तू नसून, तिथे साठलेल्या आठवणी, न बोललेले संवाद आणि मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या भावना यांचं प्रतिबिंब ठरतं आणि हेच ‘तिघी’ ठळकपणे मांडतो.



चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ''आई आणि मुलीचं नातं अनेकदा शब्दांपलीकडचं असतं. प्रेम व्यक्त होत नाही, ते जाणवतं. वेदना बोलल्या जात नाहीत, त्या समजल्या जातात. ‘तिघी’मधून आम्ही अशाच न बोललेल्या संवादांचा आणि न दिसणाऱ्या भावनांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या एका कोपऱ्याला नक्कीच स्पर्श करेल.”


या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे वेगळ्या, प्रगल्भ आणि संवेदनशील नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.