शालिनी नाही आता तायडी म्हणा...
सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर झळकणार स्टार प्रवाहच्या तुझ्या सोबतीने मालिकेत
स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली. खलनायिका म्हण्टलं की शालिनी आपसूकच डोळ्यासमोर उभी रहाते. मात्र आता शालिनी नाही तर तायडीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेतून माधवी पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे.
तायडी या भूमिकेविषयी सांगताना माधवी म्हणाली, ‘पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे. प्रचंड उत्सुकता आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं संपल्यानंतर खलनायिका साकारण्यासाठी विचारणा होत होती. मात्र मला काहीतरी नवं आणि आव्हानात्मक करायचं होतं. याच कारणास्तव सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. या सहा महिन्यात कुटुंबाला वेळ दिला. तुझ्या सोबतीने मालिकेतल्या तायडी या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा त्या भूमिकेचं वेगळेपण मला भावलं. आधीच्या पात्रापेक्षाही आणखी छान पद्धतीने व्यक्तिरेखा कशी रंगवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तायडी इतरांना गिल्ट देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात तरबेज आहे. तिचा नशिबावर अजिबात विश्वास नाही. तिच्या मते आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवायची असते. नशिबावर सोडायची नसते. प्रचंड फिटनेस फ्रिक असलेल्या तायडीला खाण्यात पदार्थाच्या जागी कॅलरीज दिसतात. खऱ्या आयुष्यातही मी फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळे तायडी आणि माझ्या खऱ्या आयुष्यातलं फिटनेस प्रेम छान जमून आलं आहे. नव्या वर्षाची सुरुवात नव्या मालिकेने आणि नव्या पात्रासह होणार आहे. प्रेक्षकांचं या भूमिकेलाही प्रेम मिळावं अशी इच्छा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका तुझ्या सोबतीने लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.
