*अवघ्या महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत!*
बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो ठरतोय महाराष्ट्रप्रेमाचा महापूर!
मुंबई, १६ डिसेंबर २०२५ : ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत होता, तो बहुप्रतिक्षित क्षण अखेर साकार झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड ठरतोय. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे. बिग बॉस मराठी ६ चा बिगुल वाजलाय… आणि महाराष्ट्र सज्ज झालाय आपल्या लाडक्या भाऊसोबत पुन्हा एकदा या प्रवासात सहभागी होण्यासाठी. बिग बॉस मराठी सिझन ६ सुरू होतोय ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर.
पारंपरिक वेशभूषेत आणि दमदार स्वॅगमध्ये दिसणारा रितेश देशमुख म्हणजे केवळ शोचा होस्ट नाही, तर तो महाराष्ट्राचा ‘आपला भाऊ’ आहे, हे या प्रोमोने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणुकीतून होणारी त्यांची एंट्री, हजारो लोकांचा जल्लोष आणि आजीच्या मिठीतला हळवा क्षण… प्रत्येक फ्रेममधून आपुलकी, संस्कृती आणि महाराष्ट्रप्रेम ओसंडून वाहत आहे. त्यामुळेच हा प्रोमो पाहणाऱ्यांसाठी फक्त एक घोषणा न राहता एक भावनिक अनुभव ठरत आहे. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!” या कडक संवादाने प्रेक्षकांची धडधड आणखी वाढवली आहे. यंदा स्वॅग तोच असणार असला, तरी पॅटर्न मात्र भाऊचा असणार. घरात कोण येणार, कोणाची परीक्षा होणार, कोणाचं नशीब फळाला येणार—सगळं अजून गुपित असलं, तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात सध्या एकच विषय, एकच उत्सुकता—बिग बॉस मराठी सिझन ६. या प्रोमोसोबतच बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची अधिकृतपणे घोषणा झाली असून, प्रेक्षक सज्ज झाले आहेत एका नव्या, थरारक आणि भावनिक प्रवासासाठी. मनोरंजनाबरोबरच हा सिझन महाराष्ट्राचा रोजचा मूड आणि चर्चा ठरवणार, हे नक्की.
