Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेच्या १००० भागांच्या पूर्ततेनिमित्ताने कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी*

 *तीन वर्ष, १००० भाग आणि उलगडणार सर्वात मोठं रहस्य*


*स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेच्या १००० भागांच्या पूर्ततेनिमित्ताने कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी*


प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळेच गेली तीन वर्ष स्टार प्रवाहची ठरलं तर मग मालिका नंबर वन स्थानावर विराजमान आहे. तीन वर्ष आणि १००० भागांच्या यशस्वी टप्पा पार केल्यानंतर मालिकेतल्या सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे. ठरलं तर मगच्या पहिल्याच भागात प्रतिमाचा अपघात होतो. या अपघातामागे महिपतच असल्याचं सत्य सर्वांसमोर येणार आहे. सायली आणि अर्जुनने मिळून महिपतचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मालिकेचे पुढचे भाग उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही. १००० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ठरलं तर मगच्या कलाकारांनी काही खास आठवणी सांगितल्या आहेत.



सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, ‘आपल्या नवीन मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा येतो तेव्हा पोटात जो गोळा येतो तसाच आजही येतो. जी मालिका मला माझ्या आजारपणानंतर मिळाली ती यशस्वी होणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. सलग तीन वर्ष बऱ्याच प्रोजेक्टला नाही म्हणत होते. का कोण जाणे पण मनातून ती प्रोजेक्ट्स करावीशी वाटत नव्हती.. ते म्हणतात ना मनातून होकार यावा लागतो..अशा कामाची वाट बघत होते.. देवाला सतत सांगत होते माझी दमछाक होईल असा प्रोजेक्ट दे.. एकवेळ पैसे कमी चालतील पण माणसं चांगली दे.. काम चांगलं दे.. घरी जाताना एक समाधान वाटलं पाहिजे असं काम दे.. आणि देवाने अगदी तसंच केलं! काम तर सुंदर दिलंच.. पैसा दिलाच.. माझं पहिलं अवॉर्ड दिलंच, पण ज्यांच्या बरोबर रोज इतके तास घालवायचे, काम करायचं ती माणसंही चांगली दिली. आत्ताच्या काळात चांगले निर्माते मिळणं, कामाचा मोबदला चांगला मिळणं.. मुळात वेळच्यावेळी मिळणं एकही रुपया कमी न पडता ही खूप मोठी गोष्टं आहे! त्याशिवाय स्टार प्रवाहसारखी एक चांगली वाहिनी मिळणं आणि चांगली मालिका मिळणं जी १००० चा टप्पा गाठेल ही त्याहुन मोठी गोष्ट!  आज आमच्या या लाडक्या बाळाचे “ठरलं तर मग” चे १००० भाग पूर्ण होत आहेत!! आमच्या या बाळाला तुम्ही इतकं प्रेम देताय हे बघून मन खुप भरुन येतंय. १००० भाग होऊनही तुमचं प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही.. उलट प्रत्येक भागागणिक वाढतंय हे बघून आम्हा सगळ्यांनाच, कितीही थकलो, कितीही महासंगम केले तरी नवी ऊर्जा मिळते. आमची सगळीच टीम पोटतिडकिने कामं करतात. कुठल्याच डिपार्टमेंटचा माणूस कुठल्याही इतर डिपार्टमेंटचं काम करायला नकार देत नाही. माझ्या तब्बेतीच्या कुरबुरी दरवेळी सांभाळून घेणाऱ्या सगळ्यांचे आभार. आज मन भरुन कौतुक करावसं वाटतंय ते माझ्या स्पॅाट टीमचं! मी कितीला येणार आहे त्यानुसार माझ्यासाठी जेवण, नाश्ता काढून ठेवणं ते गोळ्या घेतल्या का? याची आठवण करुन देणं! मी जेवले नाही तर मला दामटवणं, आराम करायला सांगणं, काळजी घेणं हे केवळ “काम” म्हणून न करता मनापासून सगळं करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सकाळी अर्धवट झोपेत जेव्हा मी सेटवर येते तेव्हा युनीटचे प्रसन्न चेहरे बघून मला ऊर्जा मिळते. ही सगळी चांगली माणसं देवाचीच भेट आहेत. आणि आजचा योग बघा! ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतंय त्या माझ्या दत्त महाराजांची आज दत्त जयंती. याहून मोठा आशिर्वाद काय असेल. माझ्याकडून चांगलं काम होत राहो हीच महाराजांकडे प्रार्थना. प्रेक्षकांचे खूप खूप आभार.


कल्पनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता दिघे म्हणाल्या, ‘प्रेक्षकांचे मनापासून आभार आज त्यांच्यामुळेच मालिका सातत्याने नंबर वन वर आहे. मात्र या प्रवासात आम्ही जर काही गमावलं असेल तर ती आमची पूर्णा आजी. तिच्या जाण्याचं दु:ख कायम मनात राहिल. हजार भागांचा हा सोहळा पहाण्यासाठी ती आज हवी होती. मात्र तिचे आशीर्वाद आमच्या सोबत कायम रहाणार आहेत.’ 


अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली म्हणाला, ‘मधुभाऊंना निर्दोष करण्यासाठी जो कोर्टाचा सीन आम्ही केला तो मी कधीही विसरु शकणार नाही. जवळपास ५० भागांचा सीन मी केला होता. ही आठवण कायम स्मरणात राहिल.’


प्रतिमा म्हणजेच अभिनेत्री शिल्पा नवलकर म्हणाल्या, ‘मला आजही मालिकेच्या पहिल्या भागातल्या अपघाताचा सीन आठवतो. मध्यरात्री आम्ही तो शूट केला होता. पहिल्या भागाच्या या अपघाताचे पडसाद अगदी हजाराव्या भागापर्यंत सुरु आहेत. अत्यंत कठीण असा हा सीन होता. आज मागे वळून पहाताना असं वाटतं की त्या प्रसंगामुळेच आज अख्खी मालिका उभी राहिली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरुन प्रेम मिळालं. असंच भरभरुन प्रेम प्रेक्षकांनी द्यावं हीच इच्छा.’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.