Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मराठी शाळा आणि मातृभाषेचा अभिमान जपण्यासाठीच्या लढ्याची हाक!*

 *मराठी शाळा आणि मातृभाषेचा अभिमान जपण्यासाठीच्या लढ्याची हाक!*

*‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील दमदार आणि तुफान ‘हाकामारी’ गाणे प्रदर्शित*


हेमंत ढोमे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या प्रेरणादायी ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठी शाळा, मातृभाषा आणि तिच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाला ताकद देणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. ट्रेलरमधून उभ्या राहिलेल्या या ज्वलंत भावनेनंतर आता चित्रपटातील संघर्ष अधिक तीव्र करणारे ‘हाकामारी’ हे दमदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पुण्यातील डेक्कन चौक येथे रात्री बारा वाजता हे गाणे एका वेगळ्या पद्धतीने लॉंच करण्यात आले. यावेळी काही महिलांनी या गाण्यावर दर्जेदार नृत्य सादर केले. कपाळावर लाल टिका, मोकळे केस अशा भयावह लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले. 



मराठी शाळा टिकवण्यासाठी, मातृभाषेच्या अस्मितेसाठी आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहाणाऱ्या लढ्याचं प्रतीक असलेले ‘हाकामारी’ हे गाणे संघर्षाची आणि परिवर्तनाची हाक देणारे आहे. गाण्यातील प्रत्येक ठेका, प्रत्येक शब्द आणि आपल्या मातृभाषेसाठी संघर्ष देण्याची ऊर्जा निर्माण करते. या गाण्याला हर्ष-विजय यांचे दमदार संगीत लाभले असून द फोल्क आख्यान या महाराष्ट्रातील गाजलेल्या कार्यक्रमातील प्रसिद्ध गायिका अनुजा देवरे हिचा कणखर आवाज लाभला आहे. ईश्वर अंधारे यांनी या गाण्याचे धारदार शब्द लिहिले आहे. 


दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट मराठी शाळा आणि मातृभाषेच्या अस्तित्वासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याची गोष्ट अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगतो. ट्रेलरमधून आम्ही या संघर्षाची झलक दाखवली आणि ‘हाकामारी’ या गाण्यातून त्या संघर्षाला थेट आवाज दिला आहे. आज अनेक मराठी शाळा टिकण्यासाठी झगडत आहेत आणि ही परिस्थिती आपल्याला अस्वस्थ करते. ‘हाकामारी’ या संघर्षाला अंतर्मुख करणारे गाणे आहे. हा लढा केवळ या चित्रपटपुरताच मर्यादित नसून तो आता आपल्या सगळ्यांचा लढा झाला आहे.” 


‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे.


चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.