Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'निर्धार' चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित..

 'निर्धार' चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित...

२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित


नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देतो. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा 'निर्धार' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'वंदे मातरम...' या सुमधूर गीतानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली 'निर्धार' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिनानाथ वालावलकर यांनी लिहिलेल्या कथेवर चित्रपट बनविण्याची जबाबदारी दिग्दर्शक दिलीप भोपळे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. 'निर्धार'ची कथा संघर्षाची असल्याचे सांगत चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो. हातात मशाली घेऊन धावणारे लोक आणि पेटलेली वस्ती दिसते. या चित्रपटातील लढा भ्रष्टाचाराविरोधी आहे. एकजुटीच्या क्रांतीची मशाल पेटलेली या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आगीत भस्मसात होणाऱ्या वस्तीतून 'अरे कुणीतरी वाचवा रे...', अशी आर्त किंकाळी ऐकू येते आणि थेट हृदयाला भिडते. त्यानंतर 'वंदे मातरम...' गाण्याची झलक पाहायला मिळते. खरोखर भ्रष्टाचारावर काही उपाय आहेत का, त्याचं उत्तर सर्वसाधारण नाहीच असे असणार. मग तो नष्ट कसा होईल? काय उपाय आहे? लेखकांनी याचे उत्तर या सिनेमातून दिले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उत्तरोत्तर उत्कंठा वाढविण्याचे काम करणारा आहे. संघर्षाची ही कथा प्रेरणेचे वादळ घेऊन २८ नोव्हेंबरला येत असल्याचे ट्रेलरच्या शेवटी सांगण्यात आले आहे. 



'निर्धार'च्या ट्रेलरबाबत दिग्दर्शक दिलीप भोपळे यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, समाजाला विचारांची खूप मोठी शिदोरी देणारा आहे. चित्रपट हे रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने तरुणाईची कथा तरुणाईच्याच माध्यमातून पोहोचवण्याचे काम 'निर्धार' करणार असल्याचे दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले. या चित्रपटात समाजातील आणि राजकीय पटलावरील विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे. तरुणाईची मानसिकता, विचारसरणी आणि दृष्टिकोन या चित्रपटाद्वारे समाजासमोर येणार आहे. समाजात वावरताना आणि समाजासाठी कार्य करताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून 'निर्धार'ची निर्मिती केल्याची भावना निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी व्यक्त केली.


'निर्धार'मध्ये डॉ. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, कोमल रणदिवे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. वितरणाद्वारे महाराष्ट्रभरातील तमाम रसिकांपर्यंत 'निर्धार' पोहोचवण्याची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंट करणार आहे. डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, विकी बिडकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. रंगभूषा अतुल शिधये करत असून, वेशभूषा प्रशांत पारकर यांनी केली आहे. निर्मिती व्यवस्थापक कैलास भालेराव, तर अजय खाडे लाईन प्रोड्युसर आहेत. नृत्य दिग्दर्शन संग्राम भालकर यांनी केले असून, क्रिएटिव्ह प्रोड्यूसर अथर्व वालावलकर आहेत. राहुल पाटील या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, संतोष जाधव प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.