Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री महावतार बाबाजींच्या कार्याची महती सांगणारा 'फकिरीयत'...

 श्री महावतार बाबाजींच्या कार्याची महती सांगणारा 'फकिरीयत'...

२८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार 'फकिरीयत'


क्रियायोगाचे प्रणेते श्री महावतार बाबाजी जे हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत आहेत अशा रहस्यमय हिमालयीन योग्याची भेट आपल्याला 'फकिरीयत' या आगामी हिंदी चित्रपटात घडणार आहे. आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची प्रचिती देणाऱ्या गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर हा चित्रपट आधारलेला आहे. या हिंदी चित्रपटाच्या रूपात श्री महावतार बाबाजी, श्री रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, बाबा श्री कालभैरव, बाबा श्री भद्रबाहू, हेडाखान बाबा, माँ काली यांचे दर्शन आणि यासोबतच गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांचा त्यांच्या गुरु कार्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी 'फकिरीयत' प्रदर्शित होणार आहे.



'फकिरीयत' चित्रपटाची निर्मिती भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी 'फकिरीयत'चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या श्री गुरुमाई यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर आधारलेली आहे. पटकथालेखन अनिल पवार यांनी केले असून, अनिल पवार यांनीच श्री गुरुमाई यांच्यासोबत संवादलेखनही केले आहे. श्री महावतार बाबाजींची शिकवण, त्यांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची अनुभूती 'फकिरीयत' चित्रपट पाहिल्यावर येणार असून, ही केवळ बाबाजींच्या महतीची आध्यात्मिक वाटचाल नसून, त्यांच्या शिष्येला द्याव्या लागलेल्या संघर्षाची गाथाही आहे. हा चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन आला आहे. संतविचारांना सुमधूर संगीताची सुरेल जोड देण्यात आली आहे. ''चलो चले हम बाबाजी के देस...'', ''गुरु मै तेरे शरण...'', ''इतना गुरुर मत कर...'' ही या चित्रपटातील गाणी मनामनांत भक्तीभावाची ज्योत प्रज्ज्वलित करणारी आहेत.


गुरूमाई रुद्रात्मिका यांना या कलाकृतीच्या माध्यमातून सांगायचे आहे की बाबाजी आणि या चित्रपटात दाखवलेले सर्व महात्मा इतके सक्षम आणि सर्वशक्तिमान आहेत की त्यांच्या इच्छेशिवाय आपण त्यांच्या नावाने काहीही करू शकत नाही. या चित्रपटाचे आदेश त्यांच्याकडून मिळाले होते आणि म्हणूनच हे सर्व शक्य झाले. बाबा भद्रबाहू आणि बाबाजींनी सांगितलेल्या गोष्टी या चित्रपटात संवादांच्या स्वरूपात दाखवल्या आहेत. 'फकिरीयत' हे नाव देखील त्यांच्याच आदेशावरून देण्यात आले आहे. हे सर्व संत आणि महात्मे जात, धर्म, देव, देश याच्या पलीकडे आहेत. आपण भाषा आणि पोशाख यांना धर्म समजतो, पण फकीरियत ही एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती ज्ञान, महानता, त्याग दर्शवते. सर्व ज्ञान आणि दैवी शक्ती असूनही, या महान आत्म्यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. हीच फकीरियत आहे. हीच त्यागाची वृत्ती आहे. हीच या महान आत्म्यांची महानता आहे.


संत विचारांचा अनमोल नजराणा घेऊन आलेल्या 'फकिरीयत'मध्ये दीपा परब, उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनीषा सबनीस आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याखेरीज अभिनेता संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल या गायकांच्या आवाजात संगीतकार प्रवीण कुंवर यांनी गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. संकलन निलेश गावंड यांनी केले असून, डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.