Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कुर्ला टू वेंगुर्ला" चित्रपटाचे थिएटर मध्ये ५० दिवस पूर्ण*

*कुर्ला टू वेंगुर्ला" चित्रपटाचे थिएटर मध्ये ५० दिवस पूर्ण*

*मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती*



मराठी सिनेमाने चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण करणे ही तसं म्हटलं तर दुर्मिळ बाब आहे पण ही कमाल करून दाखवली आहे १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या कुर्ला टू वेंगुर्ला या मराठी चित्रपटाने. गावातल्या मुलांची न होणारी लग्न हा तसं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात दिवसेंदिवस गंभीर होत जाणारा प्रश्न घेऊन कुर्ला टू वेंगुर्ला एक मनोरंजनपर पण अंतर्मुख करायला लावणारी कथा सांगतो. कोकणच्या पार्श्वभूमी वर कथेचे सादरीकरण झाले असल्यामुळे कोकणचे सौंदर्य तिथली माणसं, त्यांच्या इरसाल प्रवृत्ती अशा विविध अस्सल मातीतल्या गोष्टी हा चित्रपट अगदी हसत खेळत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे. विशेष बाब म्हणजे सामान्य प्रेक्षकांसोबतच मान्यवर कलाकार आणि समीक्षकांनी सुद्धा या चित्रपटाला पसंतीची पावती दिली आहे. मराठी चित्रपटांना पुरेशी थेटर्स आणि प्राईम टाईम न मिळणे या सर्व त्रासातून "कुर्ला टू वेंगुर्ला" जात असला तरी केवळ प्रेक्षकांच्या पसंतीमुळे हा चित्रपट मुव्ही टाईम हब मॉल, गोरेगाव येथे संध्याकाळी 7.30 वाजता अजूनही दाखवला जातो आहे. नुकताच या चित्रपटाने चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केल्याबद्दल सिने कथा कीर्तन आणि ऑरा प्रोडक्शन या चित्रपटाच्या निर्मिती संस्थांनी मान्यवर कलाकारांसाठी एक स्पेशल शो आयोजित केला होता. अभिनेत्री  प्राजक्ता माळी, अभिनेते भारत गणेशपुरे, विजय पाटकर यांसारखे नामवंत कलाकार तसेच आत्मपॅंपलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे, व्हेंटिलेटर चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे "कुर्ला टू वेंगुर्ला" च्या खास शोसाठी उपस्थित होते. चित्रपटाला उपस्थित सर्व कलाकारांनी चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले. लोकचळवळीतून निर्माण झालेला कुर्ला टू वेंगुर्ला हा अतिशय दर्जेदार सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा अशी जाहीर इच्छा आणि आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केले आणि तिच्या सोशल मीडिया वरती तसे प्रेक्षकांना आवाहन सुद्धा केले. कोणत्याही मोठ्या पाठिंब्याशिवाय "कुर्ला टू वेंगुर्ला" थिएटरमध्ये ५० दिवस टिकून राहतो हे खरंच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केल्याची पोचपावती आहे.



प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, साईंकीत कामत, स्वानंदी टिकेकर, वैभव मांगले, सुनील तावडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचे लेखन अमरजीत आमले तसेच दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केले आहे.  चित्रपटाचे वितरण पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि हृषीकेश भिरंगी यांनी केले आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.