*स्टार प्रवाहची नवी गूढ मालिका ‘काजळमाया’चा रोमांचक लॉंचिंग सोहळा*
*दमदार सादरीकरण करुन कलाकारांनी वाढवली मालिकेची उत्कंठा*
दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी गेली ५ वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतील अशी मालिकेतली पात्र हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर २७ ऑक्टोबरपासून रात्री १०.३० वाजता नवी गूढ मालिका पाहायला मिळणार आहे. मालिकेचं नाव आहे काजळमाया. नुकताच या मालिकेचा दमदार लॉंचिंग सोहळा पार पडला. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्ड़े यांनी चेटकीण कनकदत्ताच्या रुपात मंचावर एण्ट्री घेतली आणि सारेच स्तब्ध झाले. कलाकारांनी आपल्या दमदार सादरीकरणामधून मालिकेची गोष्ट अनोख्या पद्धतीने मांडली. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक वैभव घुगेने या खास सादरीकरणाच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. प्रिया बेर्डे, मोहन जोशी, रुची जाईल, अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर, विघ्नेश जोशी, समीरा गुजर अशी अनेक दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून आपल्या भेटीला येतील. जयंत पवार या मालिकेचं दिग्दर्शन करत असून सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांच्या लेखणीतून मालिकेची कथा लिहिली जातेय. शर्मिष्ठा राऊत आणि तेजस राऊत यांच्या इरिकॉन टेलीफिल्म्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भूत गोष्टीला. ही गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या,'माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पहाता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.
स्टार प्रवाहच्या या नव्या प्रयोगाबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘गूढ, उत्कंठावर्धक असे विषय कायम रसिकांच्या स्मरणात रहातात. प्रेक्षकांनी अश्या विषयांना आधी पण पसंती दिली आहे. काजळमाया हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा विषय ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने काजळमाया खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी गूढ मालिका काजळमाया लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.’




