*तुळजा-जगदंबा आमनेसामने! देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य!*
पहा ‘आई तुळजाभवानी’, दररोज रात्री ९ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.
*मुंबई ९ ऑक्टोबर, २०२५ :* कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. देवींच्या शक्तींचा संग्राम, देवीच्या मनुष्य रुपातील भावनिक नात्यांची कसोटी आणि ‘मत्सर’ नावाच्या दुष्ट शक्तीचा प्रभाव या सगळ्यांनी कथानक अधिकच तीव्र बनवलं आहे. तुळजादेवीच्या मंदिरात घडणारा देवीचे बालरूप ‘जगदंबा’ आणि प्रत्यक्ष तुळजाभवानी यांच्यातील आमनासामना प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकणारा ठरणार आहे. आई तुळजासमोर उभी राहिलेली जगदंबा ठामपणे म्हणते “तुळजाई, मत्सर कोण आहे, हे मी शोधून काढलंय!” उमा हीच मत्सर आहे!” देवी तुळजा स्तब्ध होते, तिच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसतो. त्याचवेळी उमा शांत पण गूढ भावाने समोर येते. तिच्या स्थिर नजरेत आणि तिरकस स्वरात अघटीत गूढ दडलेलं आहे.
आई तुळजा विश्वास ठेवायला तयार नसते, पण जगदंबा निर्धाराने उभी राहते. तिच्या भोवती शक्तिचं तेज पसरतं, मंदिर हादरू लागतं, वारा सुटतो, दिव्यांची ज्योत विझते आणि गगनात विजांचा कडकडाट होतो. पुढच्याच क्षणी जगदंबा तिच्या अतिउग्र नऊवारी रूपात साक्षात देवीच्या तेजस्वी अवतारात प्रकट होते आणि उमावर प्रहार करते !! “उमाचं सत्य जगदंबा उलगडणार!” हा क्षण समोर उभा ठाकतो… त्याचा शेवट कसा होणार? या अद्भुत दैवी प्रसंगाचा परिणाम काय होणार? याची अत्यंत उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत पाहायला मिळेल.
चारही शक्तीपीठांची जागृती, मायावी दुष्काळाचा अंत आणि देवीच्या वचनांची पूर्ती झाल्यानंतर सुडाने पेटलेल्या दितीमाता आणि शुंभा यांनी रचलेला नवीन डाव ‘मत्सर रिपू’ आता जगदंबेच्या मनात शिरला आहे. तुळजा आणि उमामधील घट्ट नातं पाहून जगदंबेच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. तुळजाने उच्चारलेलं “असा मत्सर करू नकोस” हे वाक्य तिच्या मनाला भिडतं आणि तिला जाणवतं की ‘मत्सर’ हा फक्त बाहेरचा शत्रू नाही, तर तिच्या अंतर्मनातही प्रवेशला आहे.
याच जाणीवेने ती सावध बनते आणि कुटुंबातील प्रत्येकावर लक्ष ठेवू लागते. उमा आणि तुळजाचं आई-मुलीचं नातं पाहून तिच्या मनात संशय वाढतो आणि शेवटी देवीच्या मंदिरात घडतो आमनासामना जिथे सत्य आणि भ्रम, प्रेम आणि अहंकार, देवीत्व आणि मत्सर यांच्या संघर्षाचा विस्फोट होतो.
उमा खरोखरच ‘मत्सर’ आहे का? की कुणाचातरी कपटी खेळ आहे? तुळजा जगदंबेवर विश्वास ठेवेल का, की या संघर्षामुळे देवींच्या नात्यात कायमचा तडा जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत या महासप्ताहात. पहा ‘आई तुळजाभवानी’, दररोज रात्री ९ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

