येड लागलं प्रेमाचं मालिकेत राया दिसणार नरसिंह अवतारात
दोन तासांच्या मेहनतीनंतर रायाचा झाला कायापालट
स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत दसऱ्याचा जल्लोष सुरु असतानाच या उत्साहाला गालबोट लागतं ते जयच्या कुरापतींमुळे. रुक्मिणी मंदिरात आलेल्या भक्तांच्या जीवाशी खेळण्याचा तो प्रयत्न करतो. पण देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. राया नरसिंहाचा अवतार धारण करुन देवासारखा सगळ्यांच्या मदतीला धाऊन येणार आहे. अंगावर रोमांचं आणणारा हा प्रसंग शूट करण्यासाठी येड लागलं प्रेमाचं च्या संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे.
येड लागलं प्रेमाचं मालिकेसाठी धारण केलेल्या नरसिंह अवताराबद्दल सांगताना राया म्हणजेच अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘मी स्वत:ला नशीबवान समजतो की मला विविधरंगी भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत जोतिबा साकारल्यानंतर आता येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या निमित्ताने नरसिंह अवतार साकारायला मिळणार आहे. हे रुप साकारण्यासाठी प्रोस्थॅटिकचा मेकअपचा आधार घेण्यात आलाय. दोन अडीच तासांच्या मेहनतीनंतर हे रुप साकारलं गेलं. खूप संयमाचं काम होतं. या रुपात मी स्वत:ला ओळखू शकलो नाही इतकं हुबेहुब रुप आमच्या टीमने साकारलं होतं. आठवडाभर आधीपासून या सीनची तयारी सुरु होती. हा सीन शूट करताना सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं ते म्हणजे मी काही खाऊ शकणार नव्हतो. दिवसभर मी फक्त पाणी आणि ज्यूस पित होतो. संपूर्ण टीमने बरीच काळजी घेतली. देवाचा आशीर्वाद सोबत असला की सारं काही शक्य होतं असं मला वाटतं. माझं काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे रुप देखिल आवडेल अशी आशा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका येड लागलं प्रेमाचं रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
