Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार*

 *तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार*



मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक भूमिका अगदी लीलया साकारणारे सयाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतीच त्यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या महत्त्वपूर्ण चित्रपटाची घोषणा केली आहे.  



सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांचे असून दिग्दर्शन अनुप जगदाळे करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.



सातारच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे, असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्या या नव्या कलाकृतीबद्दल बोलताना सांगतात कि, ‘काहीतरी नवीन आणि वेगळा अनुभव देणारा चित्रपट करावा असं मनात होतं. सयाजी शिंदे यांच्या साथीने ही सत्यकथा भव्यदिव्य स्वरूपात मांडण्याची कल्पना सुचली. एक वेगळ्या धाटणीचा कथाविषय आणि दमदार कलाकार यांना एकत्र पहाण्याची पर्वणी प्रेक्षकांना या चित्रपटामुळे लाभणार आहे. 



गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.   


२००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट आला होता. यात सयाजी शिंदे यांच्यासोबत अनेक मात्तबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचात हा चित्रपट भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.