*‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे नवी मालिका 'ईशानी'; प्रोमो प्रदर्शित!*
https://www.instagram.com/reel/DMvReDcgPBC/?igsh=MzlzN3dwOG81dmQz
‘स्टारप्लस’ वाहिनी ‘ईशानी’ ही एक नवीन काल्पनिक कथा सादर करत आहे. ही वेधक कहाणी आहे, एका युवतीच्या स्वप्नांना आणि अस्मितेला बंधनात अडकवू पाहणाऱ्या जगाशी संघर्ष करून ती तिची ओळख परत कशी मिळवते याची! ही मालिका पाहणे हा रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच एक नवा भावनिक कथा पाहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत अशी एक दृढनिश्चयी महिला आहे, जी सामाजिक बंधनातून मुक्त होण्याचे धाडस करते. जिच्या स्वप्नांशी आणि संघर्षांशी प्रेक्षक रिलेट होऊ शकतात. ‘ईशानी’ ही मालिका केवळ एका महिलेबद्दल नाही, तर लग्नानंतर आपल्या महत्त्वाकांक्षांवर पाणी सोडणाऱ्या अनेकजणींच्या मूक लढाईचे प्रतिबिंब आहे.
ईशानीच्या एका आकर्षक एकपात्री प्रयोगाने प्रोमोला सुरुवात होते. ती स्वतःची तुलना पिंजऱ्याशी नव्हे तर आकाशाशी नाते सांगणाऱ्या पक्ष्याशी करते. जरी ती विवाहित आहे आणि नियमांनी करकचून बांधली गेलेली आहे, तरी तिचा आत्मा अभंग आहे. तिच्या नवऱ्याची अपेक्षा असते की, तिने एक महत्त्वाकांक्षी आयपीएस अधिकारी म्हणून तिची ओळख विसरून घराची आणि मुलांची काळजी घ्यावी. ईशानीला कॉलेजला जाण्याची परवानगी जरी असली तरी कुणाशी बोलायचे नाही यांसारखे कडक नियम तिच्यावर लादले गेलेले आहेत.
जेव्हा ती वर्गात प्रवेश करते आणि तिला कळते की, तिला शिकवणारा तिचा प्राध्यापक- अनुराग आहे, जो तिचा माजी प्रियकर असतो. अनुराग तिला विचारतो की, तिने त्याची वाट का पाहिली नाही? भावनांनी आणि निर्णयांनी भरलेल्या अशा भूतकाळाकडे अनुराग निर्देश करतो, ज्या भूतकाळाने दोघांना पुरते विलग केले. मालिकेच्या ‘प्रोमो’मध्ये वैयक्तिक स्वप्ने आणि लादलेली कर्तव्ये यांच्यात कसरत सुरू असलेल्या ईशानीच्या भावनिक आणि मानसिक गोंधळाचे चित्रण आहे.
या ‘प्रोमो’मध्ये वैयक्तिक वेदना आणि शांतपणे स्वत:ला पुन्हा सावरण्याची वृत्ती यांचे मिश्र सादरीकरण दिसून येते. संघर्ष, दडपलेल्या भावना आणि पुन्हा नव्याने सावरण्याची ज्वलंत इच्छा अशा विविध भावनांतून या कथेचा पाया रचला गेला आहे.
येत्या मंगळवारपासून संध्याकाळी ७:२० वाजता, फक्त ‘स्टारप्लस’ वाहिनीवर ‘ईशानी’ ही नवी मालिका पाहायला विसरू नका.