Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

 *शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम*

*गणेशोत्सवाला भक्तीचा नवा स्वर देणारं वैशाली माडे यांचं गीत प्रदर्शित*



लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असताना, याच उत्साहात आणि भक्तीभावात वैशाली माडे प्रस्तुत, पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘शंकराचा बाळ आला’ हे श्रीगणेश गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. वैशाली माडे यांच्या भावपूर्ण आणि सुरेल आवाजातील या गीताला मंदार चोळकर यांनी काव्याची ओजस्वी शब्दरचना दिली असून, वरुण लिखाते यांचे सुंदर संगीत याला लाभले आहे. या गाण्यातील कलाकारांनीही आपल्या अभिनयाने गीताला चारचाँद लावले आहेत.


या गाण्यात निसर्गरम्य कोकणात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव उलगडतो. मात्र हे केवळ एक गाणं नसून त्यातून एक हृदयस्पर्शी कथा सांगितली जाते – एका आईची, जी सैनिक आहे. गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाची सेवा करून, नंतर पुन्हा देशसेवेसाठी निघते. भक्ती, कुटुंब आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम या कथेतून आणि दृश्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.


गीतामधील योगिता चव्हाण यांचा भावपूर्ण चेहराभाव, अभिजीत केळकर यांची उत्सवी ऊर्जा आणि आरव आयेरचा निरागस आनंद  प्रत्येकाला आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारा आहे. गणेशोत्सव हा फक्त सण नसून भावनांचा, परंपरेचा आणि भक्तीचा अविष्कार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत, आरत्या आणि प्रसादाच्या सुवासात दडलेले वातावरण हे प्रत्येकाच्या मनात आनंद आणि श्रद्धेची लहर निर्माण करते. ‘शंकराचा बाळ आला’ हे गाणं या उत्सवात चैतन्याची, भक्तीभावाची आणि देशभक्तीची आणखी एक सुंदर भर घालणार आहे.



दिग्दर्शक पराग सावंत म्हणाले, ‘’ ‘शंकराचा बाळ आला’ हे गाणे बनवताना आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये तो आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला. दृश्य, संगीत आणि भावना यांचा संगम प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल, अशी आम्हाला खात्री आहे.”


गायिका वैशाली माडे म्हणतात, “गणेशभक्तीचा स्वर हा माझ्या गायकीचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत केवळ मनोरंजनासाठी नाही, तर भक्तीभाव जागवण्यासाठी आहे. यात शब्द, सूर आणि भावनांचा असा संगम आहे की, ऐकणाऱ्याला ते थेट गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात आणि भक्तीच्या लहरीत घेऊन जातं. मला विश्वास आहे की हे गाणे गणेशभक्तांच्या हृदयात दीर्घकाळ गुंजत राहील.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.