*‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवात ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ आणि ‘संकर्षण via स्पृहा चे विशेष आकर्षण!*
*मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांचे सादरीकरण*
*मुंबई, (सां. प्रतिनिधी) :* ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना दि. १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. तथापि पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये संपन्न झाला. स्थापनेपासूनच मंडळामध्ये अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये श्री. राम मराठे, श्रीमती. जयमाला शिलेदार, तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. प्रभा अत्रे, प्रा. वसंत बापट, श्री. वि. दा. करंदीकर, श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सच्चिदानंद शेवडे, श्री. रामदास कामत, श्रीमती. आशा खाडिलकर, श्री. चारुदत्त आफळे, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. प्रशांत दामले, श्री. राहुल देशपांडे, श्री. कौशल इनामदार इत्यादी अनेक कलाकारांनी, व्याख्यात्यांनी आणि मान्यवरांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. ब्राह्मण सेवा मंडळाचा यंदाचा शतकमहोत्सवी गणेशोत्सव असल्यामुळे तो संस्मरणीय राहावा अशा प्रकारे साजरा करण्याचे संस्थेने ठरविलेले आहे. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच श्रीं च्या आगमनाचा सोहळा, श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, महाप्रसाद व श्रींच्या विसर्जन सोहळ्याची पारंपारिक अशी भव्य मिरवणूक इत्यादी कार्यक्रम योजिले आहेत.
‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा एक अद्वितीय काव्यमय नाट्यप्रयोग पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याशी जोडलेले कविता-प्रेमातून उलगडणारे संवाद आणि शोध टिपण आहे. मुक्ता बर्वे यांचा अभिनय, त्यातील मुलायम पण प्रभावी अभिनय, गायन आणि काव्यसमृद्ध वातावरण दर्शकांना एका अनोख्या विश्वाची सैर घडवतो. कथा, संगीत, रेखाचित्रे आणि भावनांचा संगम प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देतो. मुक्ता बर्वे यांच्यासोबत या कार्यक्रमात अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे यांची सोबत असणार आहे. हा विशेष कार्यक्रम दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. तर दुसरा अत्यंत वेगळा कार्यक्रम सादर करण्यासाठी लोकप्रिय युवा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी येणार आहेत. त्यांच्या अनोख्या शैलीतील ‘संकर्षण via स्पृहा’ हा एक मराठी साहित्य-मनोरंजनाचा कार्यक्रम ते सादर करतील. कवितांपासून गाणी, किस्से, आठवणी आणि खास गप्पांची मैफिल संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी सादर करतील. या दोघांबरोबर सहकलाकार म्हणून विनय चौलकऱे आणि गांधीर जोग यांचीही साथ वैशिट्यपूर्ण आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. 'ब्राह्मण सेवा मंडळा'च्या सांस्कृतिक मंचावर सादर होईल.
या सोबतच दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा एक अद्वितीय काव्यमय नाट्यप्रयोग, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर. दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’- वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘संकर्षण via स्पृहा’ हा एक मराठी साहित्य-मनोरंजनाचा कार्यक्रम, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित कार्यक्रम ‘हसले मनी चांदणे’. दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. वारकरी कीर्तन – ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील. अश्या अत्यंत वेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद गणेशभक्त रसिकांना 'ब्राह्मण सेवा मंडळा'च्या सांस्कृतिक मंचाने उपलब्ध करून दिले आहे. हे सर्व कार्यक्रम रसिकांना विनामूल्य पहाता येणार असून काही रांगा आरक्षित असणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.


