झी टीव्हीचे कलाकार सांगत आहेत रक्षाबंधनाबद्दलचे त्यांचे विचार
रक्षाबंधन हा दिवस भावंडांमधील पवित्र नाते साजरे करतो, त्यांना आयुष्यभर जपलेल्या प्रेमाची, विश्वासाची आणि साथ देण्याच्या वचनाची आठवण करून देतो. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे दैनंदिन जबाबदाऱ्या आणि अंतरामुळे आप्तजन अनेकदा दूर राहतात, तिथे रक्षाबंधन ही केवळ एक पारंपरिक सण नसून एक असा सोहळा आहे जो प्रत्येक भावंडाला एकमेकांशी पुन्हा जोडतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो आणि एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. हे एक सौम्य स्मरण आहे — थोडा वेळ थांबण्याचे, राखी बांधण्याचे, आणि भावंडांमधील अद्वितीय नाते साजरे करण्यासाठी — मग शारीरिक अंतर किंवा वेळेची कमतरता असो. या खास दिवशी झी टीव्हीचे कलाकार — ‘वसुधा’ मधील परिणीता बोरठाकूर, ‘जमाई नं.1’ मधील अभिषेक मलिक, ‘जाने अनजाने हम मिले’ मधील भरत अहलावत, ‘तुम से तुम तक’ मधील वंदना पाठक आणि ‘जागृति – एक नयी सुबह’ मधील आर्य बब्बर — आपल्या भावंडांसोबत असलेल्या हृदयस्पर्शी नात्याबद्दल सांगत आहेत.
झी टीव्हीच्या ‘वसुधा’ मालिकेत चंद्रिकाची भूमिका साकारणारी परिणीता बोरठाकूर म्हणाली,
"माझा चुलत भाऊ हा नेहमीच माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम आणि खंबीर साथीदार राहिला आहे. आमचे नाते हसण्याखिदळण्याने, खोडकर भांडणांनी आणि अनेक जुन्या आठवणींनी भरलेले आहे, जे वर्षागणिक अधिकच खास होत गेले आहे. एक आठवण जी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हसू आणते ती म्हणजे — जेव्हा आम्ही लहान होतो आणि घरच्यांसोबत लांबच्या प्रवासासाठी ट्रेनने जायचो. मी कंटाळायचे, अस्वस्थ व्हायचे, पण तो नेहमी काहीतरी मजेदार करून मला गुंतवून ठेवायचा — कधी वेड्या गोष्टींच्या गोष्टी सांगून, कधी आपल्या बॅगमधून लपवून आणलेला खाऊ मला द्यायचा, तर कधी काहीतरी नवा गेम तयार करून. आम्ही दोघे खिडकीजवळ बसून तासन् तास गप्पा मारायचो, बाहेरचे जग नजरेसमोरून जाताना पाहायचो. त्याच्यासोबतचे सगळे क्षण नेहमीच प्रेम आणि उबदारपणाने भरलेले असतात. या रक्षाबंधनाला मी त्याला प्रत्यक्ष भेटण्याची, एकत्र गोडधोड खाण्याची, हसतखेळत रक्षाबंधनचा सण साजरा करण्याची आणि आमच्या नात्याइतकीच खास आणि अर्थपूर्ण राखी याच्या मनगटावर बांधण्याची खूप उत्सुकतेने वाट पाहतेय."
झी टीव्हीच्या ‘जमाई नं.1’ मध्ये नीलची भूमिका साकारणारा अभिषेक मलिक म्हणाला, "माझी बहीण ही नेहमीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आणि मार्गदर्शक राहिली आहे. मी तिचे केवळ कौतुक करत नाही, तर तीच खरी ती व्यक्ती आहे जिने मला आज मी जो काही आहे तो घडवायला मदत केली. ती माझ्यासाठी दुसरी आईच आहे. खरं तर, आजही काही घडले की सर्वप्रथम मी तिलाच फोन करतो. लहानपणापासून आमच्यात एक अबोल नाते आहे, जे आमच्या आईवडिलांनाही नेहमी जाणवायचं आणि त्यांना आवडायचं. आम्ही दोघेही एकाच गोष्टींमध्ये रमायचो, आमची एकसारखी जिज्ञासा असायची, आणि एकमेकांच्या सहवासातच दिलासा मिळायचा. आम्ही कितीही दूर असलो, तरी प्रत्येक रक्षाबंधनाला आम्ही आवर्जून भेटतो, एकत्र वेळ घालवतो आणि हा दिवस आमच्या खास परंपरेप्रमाणे साजरा करतो. आम्हा दोघांनाही खाण्याची खूप आवड आहे, म्हणून आम्ही नवीन रेस्टॉरंट्स शोधतो, आणि दिवसाचा शेवट हसत-खेळत, आठवणी, गोष्टी आणि भावंडांच्या प्रेमाने भरलेल्या जेवणाने करतो. हाच सणाचा आनंद मला दरवर्षी अनुभवायचा असतो."
झी टीव्हीच्या ‘जाने अनजाने हम मिले’ मध्ये राघवची भूमिका साकारणारा भरत अहलावत म्हणाला, “माझी बहीण माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे शब्दांत सांगणे खरंच कठीण आहे. ती नेहमीच माझी ताकद राहिली आहे — प्रत्येक प्रसंगात माझ्या पाठीशी उभी राहणारी, मी मार्ग चुकलो की मला योग्य दिशा दाखवणारी, आणि माझ्या प्रत्येक यशात माझा उत्साह वाढवणारी. आम्ही नेहमी एका टीमसारखेच राहिलो आहोत — आनंद असो वा अडचण, सगळे एकत्र वाटून घेतले आहे. मला खूप भाग्यवान वाटतं की माझ्याकडे केवळ एक नाही, तर दोन बहिणी आहेत — एक रिअल आणि एक रीलमधील — ज्या माझ्या आयुष्यात इतके प्रेम घेऊन येतात. मला आजही आठवतं, एक वेळ होती जेव्हा तिला नवीन स्कूल बॅग हवी होती, आणि फक्त तिच्यासाठी ती बॅग घेण्यासाठी मी गुपचूप पैसे वाचवले होते. तिला तिची हवी असलेली गोष्ट देणे, तिच्या छोट्या इच्छांची पूर्ती करणे, ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट होती. या रक्षाबंधनाला मी पुन्हा तेच करायचे ठरवले आहे, तिला तितकेच खास आणि जपलेले वाटावे, जसे तिने नेहमी मला वाटू दिले आहे.”
झी टीव्हीच्या ‘तुम से तुम तक’ मध्ये गायत्री देवीची भूमिका साकारणाऱ्या वंदना पाठक म्हणाल्या, "माझा भाऊ आणि मी एकमेकांशी खेळत-भांडत कसे क्षणात सगळे विसरून एकमेकांचे सर्वात मोठे पाठीराखे होतो, यात एक खास जादू आहे. माझ्या आयुष्यातल्या काही सर्वात सुंदर आठवणी त्याच्यासोबत घडलेल्या आहेत. विशेषतः आजी-आजोबांच्या घरी सुट्टीतले छान दिवस आठवतात. आम्ही लूडो, अंताक्षरी आणि रंगकामात दुपारभर हरवून जात असू. आता तो अमेरिकेत स्थायिक झालाय, आणि त्याची खूप आठवण येते. त्या क्षणांना, त्या आठवणींना मी घट्ट पकडून ठेवले आहे. आताही आठवतंय ते झाडावर आधी कोण चढणार यावरून झालेलं भांडण, अर्धा तास भाड्याने घेतलेली सायकल आणि तिच्यावर आधी कोण बसणार यावरून झालेलं वाद, आणि दररोज घोडागाडीने शाळेत जाण्याचा अनुभव — हे सगळे क्षण आजही मनात ताजे आहेत. आज आमच्यात अंतर आहे, तरी आमचे नाते अजूनही तितकेच घट्ट आहे. या रक्षाबंधनालाही, दरवर्षीप्रमाणे त्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करत, आणि लवकरच पुन्हा भेटून नव्या आठवणी निर्माण होवोत अशी आशा करत त्याला प्रेमाने राखी पाठवणार आहे."
झी टीव्हीवरील ‘जागृति – एक नयी सुबह’ मध्ये कलिकांतची भूमिका साकारणारा आर्य बब्बर म्हणाला, "माझी बहीण ही नेहमीच माझ्यासाठी दुसरी आईच राहिली आहे. मोठी म्हणून तिने मला मार्गदर्शन केले, माझे संरक्षण केले आणि एक अशी माया दिली जी उबदार आणि निरपेक्ष होती. आमच्या लहानपणी एकत्र चित्रपट बघण्यापासून ते स्वयंपाकघरातल्या गोंधळांवर हसण्यापर्यंत माझा आधार आणि सुरक्षित जागा बनून ती कायम माझ्यासोबत राहिली आहे. रक्षाबंधन माझ्यासाठी त्या नात्याचे एक साजरीकरण आहे. हा एक असा दिवस आहे जिथे मी तिच्या प्रत्येक मिठीबद्दल, प्रत्येक ओरडण्याबद्दल, आणि प्रत्येक वेळेस माझ्यासोबत उभी राहिल्याबद्दल तिचे आभार मानतो. यावर्षी, आम्ही रक्षाबंधन तसेच साजरे करतो आहोत जसे आम्हांला आवडते — घरी, संपूर्ण कुटुंबासह, गोडधोड शेअर करत, आठवणी सांगत, आणि तो सणाचा आनंद अनुभवत जो काळाबरोबर अधिक गहिरा होतो आहे."



