Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या 'फकिरीयत' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित...

 श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या 'फकिरीयत' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित...

१९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार



एक युगपुरुष एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग... या क्रिया योगाचा अवलंब करून अतिशय कमी काळात मानव आपली उत्क्रांती करू शकतो, अध्यात्मिक मार्गाने पुढे जाऊ शकतो, आयुष्याचं कल्याण करू शकतो. या योगाचे प्रणेते श्री महावतार बाबाजी जे हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत आहेत अशा  रहस्यमय हिमालयीन योग्याची भेट आपल्याला 'फकिरीयत' या आगामी हिंदी चित्रपटात घडणार आहे. १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'फकिरीयत' या सिनेमाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. मांजरेकर यांनी आजवर बऱ्याच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, 'फकिरीयत'च्या रूपात त्यांनी प्रथमच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. गुरूपौर्णिमेच्या पावन दिवसाचा मुहूर्त साधत 'फकिरीयत'चे नवे कोरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर श्री महावतार बाबाजींसोबत श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, श्री रामकृष्ण परमहंस, श्री लहिरी महाशय या महान संतांचे फोटोही आहेत. पोस्टरच्या एका बाजूला दोन्ही हात जोडून विनम्र भावनेने उभी असलेली अभिनेत्री दिपा परब दिसते. 'फकिरीयत'च्या निमित्ताने दीपाने हिंदी चित्रपटात पुनरागमन केले आहे. पोस्टरच्या दुसऱ्या बाजूला उदय टिकेकर, संदेश जाधव आणि विनीत शर्मा आहेत. 'गुरू और शिष्य की कहानी' ही चित्रपटाची टॅगलाईन 'फकिरीयत'चा मुख्य उद्देश सांगण्यासाठी पुरेशी आहे. श्री महावतार बाबाजींच्या कार्याची महती 'फकिरीयत'च्या माध्यमातून जगासमोर येणार आहे. 'फकिरीयत' हा चित्रपट एक युगपुरुष, महापुरुष, महावतार बाबाजी व त्यांचा क्रियायोग यांची खरी ओळख सांगणारा आहे. दीपाने साकारलेल्या बाबाजींच्या शिष्येच्या माध्यमातून कथा उलगडणार आहे. हा चित्रपट रसिकांना केवळ आध्यात्मिक अनुभूती देणारा नसून, जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान सांगणारा आहे. गुरू-शिष्य परंपरेचा अद्भुत वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा आहे. अध्यात्म आणि भक्ती यांचा सुरेख संगम या चित्रपटात घडविण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर आधारित आहे. पटकथालेखन अनिल पवार यांनी केले असून, पवार यांनीच अनुजा जानवलेकर यांच्यासोबत संवादलेखनही केले आहे. 



'फकिरीयत' या चित्रपटात दीपा परब सोबत विनीत शर्मा, उदय टिकेकर, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनुषा सबनीस आदी कलाकार असून संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. समृद्धी पवार यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना संगीतकार प्रवीण कुंवर यांनी मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतसाज चढवला आहे. डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.