सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देवचं मालिका विश्वात दमदार पदार्पण
स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेतून येणार भेटीला
सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक सिनेमांच्या माध्यमातून भेटलोय. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या लपंडाव मालिकेतून कृतिका मालिका विश्वात दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कृतिका सखी कामत हे पात्र साकारणार आहे. सखी श्रीमंत आणि सुखवस्तू कुटुंबातली असली तरी तिला पैश्यांचा अजिबात माज नाहीय. अडचणीत असलेल्या व्यक्तीला ती आवर्जून मदत करते. त्यासाठी आपल्या अत्यंत जवळची गोष्ट द्यायलाही ती मागे पुढे पहात नाही. सखी स्वभावाने अत्यंत गोड असली तरी भावनेच्या भरात तिच्याकडून अनेकदा अतर्क्य निर्णय घेतले जातात आणि मग हट्टाने ते पाळलेही जातात. सखीच्या आयुष्यात एकच खंत आहे ते म्हणजे आईचं प्रेम. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तिला आईचं प्रेम मिळालं. मात्र बाबा गेल्यानंतर आईनेही तिला दूर केलं. आईसोबत तिचे अध्येमध्ये खटके उडतात. मात्र भांडणाच्या निमित्ताने का होईना पण आई आपल्याशी दोन मिनिटं तरी बोलेल हीच भाबडी आशा तिच्या मनात असते.
कृतिका देवची लपंडाव ही पहिलीवहिली मालिका. आयुष्यातली पहिली गोष्ट ही नेहमी खास असते. सखी कामत या भूमिकेविषयी सांगताना कृतिका म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबतचा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की इतकं छान पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. सखी कामत अतिशय श्रीमंत घरातली मुलगी आहे. सगळी सुखं तिच्या पायाशी आहेत मात्र आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे. सखीच्या मनातली घालमेल नेमकी काय असेल हे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल. मालिकेची टीम खूपच छान आहे. प्रेक्षकांना ही मालिका नक्की आवडेल अशी भावना कृतिकाने व्यक्त केली.’ तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका लपंडाव लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.